पीटीआय, गुरुग्राम : साचारग्रस्त हरियाणामध्ये गुरुवारी, सलग चौथ्या दिवशी तणाव कायम आहे. गुरुग्राममध्ये बुधवारी संध्याकाळी २५ ते ३० जणांच्या जमावाने दोन बंगाली मुस्लीम स्थलांतरितांना मारहाण केल्याची घटना समोर आली. तर नुह येथे एका मशिदीला आग लावण्यात आली. अन्य एका मशिदीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे पोलिसांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निसार अली आणि त्याचा भाऊ रुस्तम अली अशी मारहाण करण्यात आलेल्यांची नावे आहेत. निसार अली यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून तपास सुरू आहे. निसार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी ते आपल्या भावासह घरी जात होते. त्यावेळी चार ते पाच युवकांनी त्यांना आधी नाव विचारले आणि त्यानंतर मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर आणखी २० ते २५ युवकांचा जमाव आला आणि त्यांनीही निसार आणि रुस्तम यांना जबर मारहाण केली.

दरम्यान, नुह येथे सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत संचारबंदीमधून सूट देण्यात आली. तसेच तीन तासांसाठी मोबाईल इंटरनेटवरील बंदी उठवण्यात आली. या हिंसाचारात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून १७६ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच गुरुवापर्यंत ९३ एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. दरम्यान, हा हिंसाचार म्हणजे व्यापक कटाचा भाग असल्याचा दावा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केला. त्याचवेळी या हिंसाचारात काँग्रेसची काय भूमिका आहे अशी विचारणाही केली.

हा हिंसाचार म्हणजे व्यापक कटाचा भाग आहे. मम्मन खान यांचे प्रक्षोभक विधान, त्यांची चित्रफीत आणि समाजमाध्यमावरील मजकूर यामुळे काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. – सुधांशू त्रिवेदी, राष्ट्रीय प्रवक्ते, भाजप

सरकार प्रत्येकाला सुरक्षा देऊ शकत नाही या खट्टर यांच्या विधानाशी मी सहमत आहे. पण केंद्र सरकारने केंद्रीय सुरक्षा दल का पाठवले नाही? – ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tension continues in haryana beating both of them political accusations and counter accusations ysh
Show comments