Former RSS leader communal remarks: गोव्यामध्ये जातीय तणाव निर्माण झाला असून ख्रिश्चन समुदाय रविवारी रस्त्यावर उतरला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा राज्याचे माजी प्रमुख सुभाष वेलिंगकर यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. शुक्रवारी त्यांनी ख्रिश्चन मिशनरी संत फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर गोव्यात नाराजीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक लोक आणि राजकीय नेते जुन्या गोव्यात जमू लागले असून त्यांच्याकडून निषेध आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुभाष वेलिंगकर फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. याआधीही त्यांच्यावर चिथावणीखोर विधाने केल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

रविवारी गोव्यात ख्रिश्चन समुदायाने आंदोलनाला उतरत असताना समविचारी लोकांना दक्षिण गोव्यातील मडगाव येथे निदर्शन करण्यासाठी जमण्याचे आवाहन केले. शनिवारी काही आंदोलकांनी मडगाव येथे राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांबरोबर काही वेळ झटापट झाली. पोलिसांनी पाच आंदोलकांना ताब्यात घेऊन इतरांना पांगविण्याचा प्रयत्न केला.

हे वाचा >> भाजपविरोधात बोलणे पडले महागात, गोवा संघ प्रमुखाला पदावरून हटवले

दरम्यान गोवा चर्च प्राधिकरणाने लोकांना शांततेचे आवाहन केले आहे. तसेच निदर्शने थांबवावीत असेही आवाहन केले. गोव्यातील घडामोडींवर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपाला जबाबदार धरत टीका केली. राहुल गांधी यांनी केलेल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले की, भाजपा जाणूनबुजून जातीय तणाव निर्माण करत आहे. गोव्यातील सुसंस्कृत आणि सुसंवादाचे वातावरण भाजपाच्या काळात विस्कळीत झाल्याचाही आरोप त्यांनी केला.

राहुल गांधी पुढे म्हणाले, “भाजपा जाणूनबुजून जातीय तणाव निर्माण करत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका माजी नेत्याने मुद्दामहून मुस्लीमांवर आर्धिक निर्बंध टाकण्याचे आवाहन ख्रिश्चनांना केले. संपूर्ण भारतात आरएसएसकडून अशाचप्रकारच्या कृती करण्यात येत असून त्यांच्या या आवाहनाला अतिशय वरच्या पातळीवरून समर्थन मिळत आहे.” गोव्यातील जनता आणि संपूर्ण भारतातील लोक हे फुटीरतावादी षडयंत्र पाहत असून याविरोधात एकत्र येत आहेत.

हे ही वाचा >> सरसंघचालक मोहन भागवतांचं हिंदू समाजाला आवाहन; म्हणाले, “स्वत:च्या सुरक्षेसाठी…”

सुभाष वेलिंगकर यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आतापर्यंत १२ खटले दाखल झालेले आहेत. संत फ्रान्सिस झेवियर यांना गोव्याचे रक्षक म्हटले जाते. त्यांचे अवशेष आजही जुन्या गोव्यातील बॅसिलिका ऑफ बॉम जीझस चर्चमध्ये ठेवलेले आहेत.

दरम्यान सुभाष वेलिंगकर फरार असून त्यांनी शनिवारी स्थानिक न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला. मात्र त्यांची याचिका फेटाळून लावण्यात आली. आता या प्रकरणाची सुनावणी सोमवारी होणार आहे.