वाराणसी येथील उदय प्रताप महाविद्यालयात चांगलंच तणावाचं वातावरण पाहण्यास मिळालं. कारण विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केलं होतं. यापैकी सात विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. नेमकी ही घटना काय घडली? जाणून घेऊ.

नेमकी काय घटना घडली?

उदय प्रताप महाविद्यालयाच्या आवारात एक मशीद आहे. या मशिदीजवळ शुक्रवारचं नमाज पठण करण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी जमा झाले. ज्यानंतर हिंदू विद्यार्थ्यांनी हनुमान चालीसाचा जप सुरु केला. यानंतर जो काही तणाव निर्माण झाला तो निवळावा यासाठी पोलिसांना बोलवण्यात आलं. पोलिसांनी सात आंदोलक विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं आहे. संभल येथील मशिदीच्या वादाचं लोण या महाविद्यालयातही पोहचल्याचं पाहण्यास मिळालं.

२०१८ मधली नोटीस व्हायरल झाल्यानेही वादात भर

दरम्यान महाविद्यालय प्रशासनाला उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्डाने २०१८ मध्ये एक नोटीस जारी केली होती. ही नोटीस सोशल मीडियावर व्हायरल झाली. या नोटिशीत महाविद्यालय व्यवस्थापनाला हे सांगण्यात आलं होतं की वाराणसीतील वसीम अहमद नावाच्या व्यक्तीने महाविद्यालय परिसरात जी मशीद आहे त्या मशिदीच्या जमिनीची नोंदणी वक्फ बोर्डाची मालमत्ता म्हणून करावी ही मागणी केली. मात्र तूर्तास या जागेबाबत वक्फ बोर्डाकडे कुठलेही प्रश्न प्रलंबित नाहीत असं महाविद्यालयाने स्पष्ट केलं. मात्र हे कारण आणि व्हायरल झालेली नोटीस यामुळे हा वाद पेटला. याचं महत्त्वाचं कारण ठरलं ते म्हणजे आजच्या शुक्रवारी या मशिदीत नमाज पठण करण्यासाठी सुमारे ६०० लोक आले होते. ही संख्या एरवीच्या शुक्रवारी ४० ते ५० असते. ज्यानंतर या नमाज पठणाला विरोध म्हणून हनुमान चालीसा म्हणण्यास इतर विद्यार्थ्यांनी सुरुवात केली आणि वाद चिघळला.

मशिदीमध्ये ६०० जण जमा झाल्याने वाद चिघळला

मशिदीमध्ये ६०० जण जमा झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या गेटवर जमत मोठमोठ्याने हनुमान चालीसा म्हणण्यास सुरुवात केली. दोन समूहांतला हा वाद इतका वाढला की शेवटी पोलिसांना पाचारण करावं लागलं. पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतलं. यातले काही विद्यार्थी हे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी होते. शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. मात्र आजच या मुलांना जामीनही मंजूर करण्यात आला. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

उदय प्रताप महाविद्यालय परिसरात पाच संस्था

उदय प्रताप महाविद्यालय ही संस्था १०० एकरांमध्ये वसलेली शैक्षणिक संस्था आहे. या परिसरात उदय प्रताप महाविद्यालय, राणी मुरार कुमारी बालिका इंटर कॉलेज, उदय प्रताप पब्लिक स्कूल, मॅनेजमेंट कॉलेड आणि ऑटोनोमस कॉलेज अशा पाच संस्था आहे. या ठिकाणी या शैक्षणिक संस्थांमध्ये सुमारे १७ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. दरम्यान हा वाद झाल्याने उदय प्रताप महाविद्यालय चर्चेत आलं आहे.

Story img Loader