प्रसिद्ध हवामानशास्त्रज्ञ आर. के. पचौरी यांच्याविरुद्ध लैंगिक छळाची तक्रार करणाऱ्या महिला तक्रारदाराने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ‘टेरी’कडून आपल्याला अत्यंत अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप या तक्रारदाराने केला असून तो संघटनेने सपशेल फेटाळला आहे.
टेरी संस्थेकडून आपल्याला जी वागणूक मिळत आहे ते आपल्याला मानसिक, व्यावसायिक आणि आर्थिकदृष्टय़ा हानीकारक आहे, असे तक्रारदाराने टेरीचे मानव संसाधन संचालक दिनेश वर्मा यांना पाठविलेल्या राजीनामापत्रात म्हटले आहे.
पचौरी यांच्यावर गैरवर्तणूक केल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला असतानाही संघटनेने काहीही केले नाही, असे तक्रारदाराने म्हटले आहे.
मात्र टेरीने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.संघटनेने तक्रारदाराला योग्य वर्तणूक दिली असून त्यांच्या सर्व मागण्या
मान्य करण्याचा विशेषाधिकारही दिला आहे, असे संघटनेने म्हटले आहे.
संघटनेने कोणावरही मेहेरनजर केलेली नाही, त्यामुळे तक्रारदाराने केलेली तक्रार पूर्णत: खोटी आणि निराधार आहे, असेही संघटनेने एका निवेदनात म्हटले आहे. पचौरी यांच्याविरुद्ध १३ फेब्रुवारी रोजी लैंगिक छळ केल्याबद्दल एफआयआर नोंदविण्यात आला होता.

Story img Loader