गेल्या १५ तासांपासून नागरिकांना ओलीस ठेवण्यात आलेल्या सिडनी शहरातील लिंड कॅफेत धडक मारण्यात पोलिसांना सोमवारी रात्री यश आले. कॅफेच्या आत दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तेथील सर्व ओलीसांची सुटका करण्यात यश आले असून, यामध्ये इन्फोसिस कंपनीच्या भारतीय व्यक्तीचाही समावेश आहे.
दरम्यान, पोलिसांना याप्रकरणाच्या सुत्रधाराची ओळख पटली असून, संबंधित व्यक्ती गुन्हेगारी पार्श्वभूमीची असून त्याचे नाव हारून मोरिस असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्यावर लैंगिक शोषण आणि ऑस्ट्रेलियन सैनिकांच्या कुटुंबियांना द्वेषपूर्ण पत्रे पाठविल्याबद्दल याअगोदरही गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याने सोमवारी सकाळी येथील लिंड कॅफेत शिरून ४० लोकांना बंधक बनवले होते. त्यापैकी सहा जणांना पळून जाण्यातही यश आले होते. सिडनी पोलिसांनी बचावकार्य हाती घेतल्यानंतर ओलीसांमध्ये असलेल्या भारतातील इन्फोसिस कंपनीच्या कर्मचाऱ्याचीही सुटका करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फोटो गॅलरीः सिडनीमध्ये थरारनाट्य
सध्या सिडनी पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा दिला असून, ओलीस ठेवलेल्या लोकांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पोलीस लिंड कॉफी शॉपमध्ये अडकलेल्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. वृत्तवाहिन्यांवर दाखविल्याप्रमाणे काहीजण खिडकीवर हात वर करून उभे असलेले दिसत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्याने ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबॉट यांच्याशी चर्चा करण्याची मागणी केली आहे.
या घटनेवर टोनी अॅबॉट यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. ही घटना चिंताजनक असली, तर लोकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन त्यांनी केले. सिडनी शहराजवळून जाणारा हवाई मार्ग बंद करण्यात आला आहे. या कॅफेजवळील इमारती मोकळ्या करण्यात आल्या आहेत. तसेच सिडनीतील प्रसिद्ध ओपेरा हाऊसही मोकळे करण्यात आले आहे. प्रशिक्षित पोलीस कर्मचाऱ्यांकडून येथे बचावकार्य सुरू असल्याचे न्यू साउथ वेल्सच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. दहशतवाद्याने कोणत्या कारणांसाठी या कॅफेतील ग्राहकांना ओलीस ठेवले आहे, हे सुद्धा स्पष्ट झालेले नाही, असे न्यू साऊथ वेल्सचे पोलीस आयुक्त अॅंड्रयू सिपीओन यांनी सांगितले.
सिडनीतील घटना दुर्दैवी आणि अमानवी असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. कॅफेमध्ये ओलीस ठेवलेल्या सर्वांच्या सुरक्षित सुटकेसाठी आपण प्रार्थना करतो, असेही त्यांनी म्हटले आहे. संसदीय कार्यमंत्री यांनी लोकसभेमध्ये ओलीसांमध्ये एका भारतीय व्यक्तीचा समावेश असल्याचे सांगितले. संबंधित व्यक्तीच्या सुटकेसाठी ऑस्ट्रेलियातील भारतीय अधिकारी तेथील सरकारच्या संपर्कात आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Terror attack in australia as several hostages are taken inside sydney cafe