स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकलचे अपहरण करून लष्करी छावणीवर गोळीबार करणाऱया तीन दहशतवाद्यांपैकी दोघांना कंठस्नान घालण्यात लष्कराला शुक्रवारी यश आले. तिसऱया दहशतवाद्याला पकडण्यासाठी कसून प्रयत्न करण्यात येत आहेत. लष्कराचे जवान आणि या दहशतवाद्यामध्ये धुमश्चक्री सध्या सुरू आहे. या घटनेमुळे जम्मू-पठाणकोट राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सध्या बंद करण्यात आली आहे.
लष्कराच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी शुक्रवारी सकाळी एका स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकलचे अपहरण करून केलेल्या गोळीबारात एक जण ठार तर तीन जण जखमी झाले. दहशतवाद्यांनी या गाडीतून कथुआच्या दिशेने जात तेथे लष्कराच्या छावणीवरही गोळीबार केला. या गोळीबारात एक जवान जखमी झाला.
जम्मू-कथुआ राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या गाडीतील प्रवाशांवरच गोळीबार केल्यामुळे एकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर सुरक्षारक्षकांनी तातडीने संबंधित गाडीचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. लष्कराच्या छावणीवर हल्ला चढविण्यापूर्वी दहशतवाद्यांनी अपहरण केलेली गाडी सहारखुद जवळ सोडून दिली. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत होते. लष्कराकडील हेलिकॉप्टरही या भागात पाठविण्यात आले होते. जम्मू-काश्मीर पोलीसही लष्कराच्या शोधकार्यात सहभागी झाले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा