* इंटरपोलच्या अधिवेशनात गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची स्पष्टोक्ती
*१९९३ स्फोटातील सूत्रधारांना पाकिस्तानमध्ये आश्रयस्थान
मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा सूत्रधार दाऊद इब्राहिम याच्यासह अनेक जबाबदार हस्तकांविरोधात ठोस पुरावे देऊनही त्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानने आजवर यासंबंधात कोणतीही कारवाई केली नाही, याकडे बोट दाखवत गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भारतासमोर दहशतवादाची भीती कायम असल्याचे रोममध्ये सुरू असलेल्या इंटरपोलच्या वार्षिक अधिवेशनात स्पष्ट केले.
भारताला विविध आघाडय़ांवर दहशतवादापासून धोका असून, विशेषकरून सीमेपलीकडील दहशतवादाचा सामना करावा लागत आहे. संपूर्ण दक्षिण आशियामध्येच दहशतवादाचा हुकमी शस्त्र म्हणून वापर केला जात आहे.
आजवर पाकिस्तानसोबत १९९३च्या स्फोटांतील सूत्रधारांबाबत विविध चर्चा झाल्या तसेच तेथे आश्रय घेतलेल्या हल्ल्याच्या हस्तकांबाबत विविध पुरावे सादर करण्यात आले, तरीही त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.या स्फोटांचे भारतीय नागरिक असलेले ‘मास्टर माइंड’ पाकिस्तानात राहत असल्याचे सर्वज्ञात आहे, इंटरपोलनेदेखील त्यांच्याविरोधात नोटीस काढली आहे, मात्र त्यांना पकडण्यात यश आलेले नाही. साधी कार्यपद्धती आणि कमी क्षमतेच्या अस्त्रांनी भारतामध्ये मोठा कोलाहल माजविता येतो, हे २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यांनी दाखवून दिले आहे. या हल्ल्यांमुळे मोठय़ा प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. भीती निर्माण करून आमचे रोजचे जगणे बिघडवून टाकण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न राहिला आहे. मात्र सुदैवाने भारतीय समाजाने दहशतवाद्यांनी निर्माण केलेल्या भीतीला भीक न घालता कायम त्या परिस्थितीचा निकराने सामना केला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सहकार्याची गरज
मुंबईवर झालेला १९९३ आणि २००८चा हल्ला, अमेरिकेवर झालेला २००१ सालचा हल्ला यांसारख्या घटना टाळायच्या असतील, तर तपास यंत्रणा, गुप्तचर यंत्रणा यांच्यामध्ये सहकार्याची आवश्यकता आहे. दहशतवादी घटकांवर कठोर कारवाईसाठी भारत सरकार कटिबद्ध असून योग्य परिणामांसाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची तीव्र गरज असल्याचे शिंदे म्हणाले. इंटरपोलने ‘रेड कॉर्नर नोटीस’ बजावलेली दहशतवाद्यांची १३८ प्रकरणे भारतात अद्याप प्रलंबित आहेत. या दहशतवाद्यांनी भारतातून पोबारा करून इतर राष्ट्रांमध्ये आश्रय मिळविला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
दहशतवाद्यांची शेअर बाजारात गुंतवणूक
रोम : दहशतवाद्यांद्वारे बनावट कंपन्यांचा आधार घेऊन शेअर मार्केटमध्ये होणाऱ्या गुंतवणुकीबाबत चिंता व्यक्त करीत, या गोष्टी टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची आवश्यकता सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली. दहशतवाद्यांच्या बेनामी कंपन्यांद्वारे शेअर बाजारातील गुंतवणुकीचा तपशील ठोस सूत्रांनी पुरविला आहे. कथित व्यवसायांद्वारे दहशतवादी शेअर बाजारामधून पैसा उभारत असल्याचे सिद्ध झाले आहे. अशा कंपन्यांची माहिती, त्यांचे छुपे व्यवहार आणि कार्यपद्धती यांची माहिती करून घेणे आवश्यक असून इंटरपोल त्यामध्ये मोठी भूमिका बजावू शकते, असे शिंदे म्हणाले.
काय अपेक्षित? दहशतवाद्यांना पकडण्यासाठी विविध देशांच्या सीमा आणि तेथील कायद्यांनुसार कारवाई करावी लागते. यामध्ये भरपूर वेळेचा अपव्यय होतो आणि तपासामध्ये अडचणी येऊ शकतात. इंटरपोलने या अडथळ्यांना दूर करणारी यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे. दहशतवादासंबंधात चालणाऱ्या खटल्यांबाबतच्या माहिती आणि तपासातील दुवे पारदर्शी करण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी, शोधण्यासाठी, हस्तांतरणासाठी, पुरावे उभारण्यासाठी योग्य यंत्रणा उभारण्याची गरजही शिंदे यांनी व्यक्त केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा