Israel Attack on Hezabollah : इस्रायलने लेबनॉनच्या दक्षिण बैरुतमधील हेझबोलाच्या मुख्यालयावर शुक्रवारी केलेल्या हल्ल्यामध्ये त्यांचा प्रमुख हसन नरसल्ला ठार झाला. यामुळे एका मोठ्या दहशतवाद्याचा अंत झाल्याचं म्हटलं जातंय. परंतु, अद्यापही येथे चकमकी सुरूच आहेत. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेन्यामिन नेतान्याहू यांच्याशी चर्चा केली. त्यांनी याबाबत एक्सवर माहिती दिली.

पश्चिम आशियातील अलीकडील घडामोडींबद्दल पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी बोललो. आपल्या जगात दहशतवादाला स्थान नाही. प्रादेशिक वाढ रोखणे आणि सर्व ओलिसांची सुरक्षित सुटका सुनिश्चित करणं महत्वाचं आहे. शांतता आणि स्थिरता लवकरात लवकर प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना भारताचा नेहमीच पाठिंबा असेल”, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं.

गेल्या आठवड्याभरात इस्रायलने हेजबोलाविरोधात आक्रमक कारवाई केली आहे. त्यामुळे हसन नसराल्लहासह सात प्रमुख नेते या हल्ल्यांमध्ये मारले गेले आहेत. दक्षिण इस्रायलवर अचानक झालेल्या हल्ल्यानंतर गाझामध्ये हेझबोला संघटना हमासबरोबर सैन्यांत सामील झाली होती. त्यामुळे इस्रायलने हेझबोलालाही लक्ष्य केलं होतं. मारला गेलेला नाबिल कौक हा एक अनुभवी कमांडर होता. तो १९८० च्या दशकात हेझबोलामध्ये सामील झाला होता. तर, नसराल्लाह हा संभाव्य उत्तराधिकारी मानला जात होता. हेझबोलाने उत्तर इस्रायलवरील रॉकेट आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरूच ठेवले आहेत. मात्र, त्यापैकी बहुसंख्य रॉकेट, क्षेपणास्त्रे आधीच नष्ट करण्यात आली किंवा ती निर्मनुष्य जागेत पडली.

हेही वाचा >> Pakistan Violence : हेझबोलाचा कमांडर नसराल्लाहच्या हत्येचा पाकिस्तानात शोक; जमावाकडून कराचीत हिंसाचार; पोलिसांकडून अश्रूधुराचा मारा

अमेरिकेच्या हल्ल्यात सीरियात ३७ अतिरेकी ठार

सीरियामध्ये केलेल्या दोन हल्ल्यांमध्ये इस्लामिक स्टेट आणि अल कायदा या दहशतवादी संघटनांशी संबंधित ३७ अतिरेकी ठार झाल्याची माहिती अमेरिकेच्या लष्कराने रविवारी दिली. हे हल्ले १६ सप्टेंबर आणि २४ सप्टेंबरला करण्यात आले. मृतांमध्ये दोन महत्त्वाच्या अतिरेक्यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

पाकिस्तानात दगडफेक

 नसराल्लाहच्या मृत्यूचे अनेक मुस्लीम राष्ट्रांमध्ये पडसाद उमटू लागले आहेत. भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्येही या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. पाकिस्तामधील एक मोठा वर्ग नसरल्लाहच्या मृत्यूनंतर शोक व्यक्त करत आहे. रविवारी (२९ सप्टेंबर) कराचीमध्ये तीन हजारांहून अधिक लोक रस्त्यांवर उतरले होते. या जमावाने इस्रायल व अमेरिकेविरोधात घोषणाबाजी केली. तसेच लोकांनी दगडफेकही केली.