भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पाश्र्वभूमीवर संयुक्त राष्ट्रामधील चर्चासत्रात भारताने ना’पाक’ धोरणांचे चांगलेच वाभाडे काढले. दहशतवादाचा राष्ट्रीय धोरण असलेले देश हे अल्पदृष्टी असून त्यांनाही या भस्मासुराची झळ बसली आहे, अशी आठवण भारताने करून दिली.
दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार यांच्या अध्यक्षतेखालील या चर्चासत्रात भारताचे संयुक्त राष्ट्रातील प्रतिनिधी हरदीप सिंग पुरी यांनी पाकिस्तानच्या धोरणांचा आक्रमकपणे समाचार घेतला. दहशतवादविरोधी लढाई ही सर्वव्यापी होण्याची आवश्यकता आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने या विषयावर भेदभावपूर्ण नीतीचा त्याग करायला हवा, असे त्यांनी स्पष्ट केले.
दहशतवादरूपी भस्मासुर त्यांच्या आश्रयदात्यांवरच उलटल्याच्या अनेक घटना जगभरात घडल्या आहेत. आगीशी खेळणाऱ्या व्यक्तीला चटका बसतो, ही जुनी म्हण दहशतवादाला आश्रय देणाऱ्या देशांनी लक्षात ठेवावी. भारतासह सर्व दक्षिण आशियाई देशांनी मागील अडीच दशके अल्-कायदा, तालिबान, लष्कर-ए-तोयबा, जमात-उल-दवा यांसारख्या दहशतवादी संघटनांच्या कृत्यांची झळ सोसली आहे.
दहशतवाद, मूलतत्त्ववाद आणि कट्टरवाद हे शांती, प्रगती आणि समृद्धी या मार्गातील अडथळे आहेत. दहशतवादी संघटना हे एका देशातील नागरिकांना भरती करतात तर दुसऱ्या देशांतून या कार्यासाठी संपत्ती गोळा केली जाते तर तिसऱ्याच देशात यांची संघटना आपले उपद्रवमूल्य दाखवत असते. आंतरराष्ट्रीय समुदायाच्या विरोधात अनियंत्रित हल्ले करणाऱ्या या संघटनांची अंडरवर्ल्ड, मादक पदार्थाचे माफिया, शस्त्रास्त्रांचे तस्कर यांच्याशीही संगनमत असल्याची माहिती पुरी यांनी यावेळी दिली.
सुरक्षा परिषदेचे भारताचे अस्थायी सदस्यत्व मागील महिन्यात संपुष्टात आले असून सध्या या परिषदेचे अध्यक्षपद पाकिस्तानकडे आहे. मंगळवारी दिवसभर चाललेल्या या चर्चासत्रात भारताने सक्रिय सहभाग घेतला. पाकिस्तानच्या पररराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार यांच्याशी पुरी यांनी यावेळी हस्तांदोलनही केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा