आज सकाळी जम्मू काश्मीरमध्ये लष्कर ए तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना गावकऱ्यांनी पडकलं आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि एके-४७ बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत. संबंधित दहशतवादी जम्मूच्या रियासी भागात लपून बसले होते, त्यांना गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. तालिब हुसैन शाह असं मुख्य दहशतवाद्याचं नाव आहे. त्याला ९ मे २०२२ रोजी भाजपाने लेटरहेड जारी करत जम्मू विभागाचा भाजपाचा आयटी सेल प्रमुख बनवलं होतं.
शाह यांच्या नियुक्तीच्या वेळी जम्मू आणि काश्मीरच्या भाजपा अल्पसंख्याक आघाडीने एक आदेश जारी केला होता. संबंधित आदेशात म्हटलं की, “श्री तालिब हुसैन शाह यांची तातडीने राजोरी जिल्ह्याच्या द्रज कोटरांका, बुढानचे नवीन आयटी सेल प्रमुख आणि सोशल मीडिया प्रभारी म्हणून नियुक्ती केली जात आहे.”
एवढंच नव्हे तर, दहशतवादी तालिब हुसैन शाहचे जम्मू-काश्मीर भाजपाचे अध्यक्ष रवींद्र रैना यांच्यासह अनेक वरिष्ठ भाजपा नेत्यांसोबतचे फोटोही समोर आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी तालिब हुसैन शाह हा पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी कासिमच्या संपर्कात होता. अलीकडच्या काळात राजौरी जिल्ह्यात झालेल्या बॉम्बस्फोटाच्या तीन घटनांमध्ये त्याचा सहभाग होता. याशिवाय नागरिकांच्या हत्या आणि ग्रेनेड स्फोट घडवण्यात देखील त्याचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर भाजपाचे प्रवक्ते आरएस पठानिया यांनी स्पष्टीकरण देत सारवासारव केली आहे. ते म्हणाले की, “ऑनलाइन पद्धतीने सदस्यत्व दिल्याने हा प्रकार घडला आहे. अशाप्रकारे सदस्यत्व देताना संबंधित सदस्याची पार्श्वभूमी तपासली जात नाही, त्याला थेट सदस्यत्व दिलं जातं. त्यामुळे भाजपात कुणीही प्रवेश करू शकतो.” हे भाजपाविरुद्धचे षडयंत्र असल्याचंही पठानिया म्हणाले.