Kashmir Terror Attack : गेल्या काही महिन्यांपासून जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ल्याच्या घटना समोर येत आहेत. दहशतवादी व भारतीय लष्करामध्ये चकमकीच्या घटनाही अनेकवेळा घडल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी दहशतवाद्यांनी दोन जवानाचं अपहरण केल्याची घटना घडली होती. तसेच दहशतवाद्यांनी सात स्थलांतरित नागरिकांची हत्या केल्याचीही घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती. या घटनेनंतर देशभरातून संतापाची लाट उसळली होती. दरम्यान, आता जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या दहशतवादी हल्ल्यात एक माजी सैनिक शहीद झाला आहे.
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे सोमवारी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात एक माजी सैनिक शहीद झाला आहे, तर त्यांची पत्नी आणि मुलगी देखील गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्याच्या घटनेनंतर तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तोपर्यंत माजी सैनिकाचा मृत्यू झाला होता. दहशतवाद्यांनी माजी सैनिक आणि त्यांची पत्नी आणि मुलीवर अचानक गोळीबार केला, अशी माहिती सांगितली जात आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
वृत्तानुसार, पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार माजी सैनिक मंजूर अहमद हे दक्षिण काश्मीरमधील कुलगाममधील बेहीबाग गावात पत्नी आणि मुलीबरोबर वास्तव्यास होते. तेव्हा त्यांच्यावर दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार करत हल्ला केला. मात्र, यात माजी सैनिक मंजूर अहमद यांच्या पोटात एक गोळी लागली. त्यामुळे या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला, तर या हल्ल्यात त्यांची पत्नी आणि मुलीच्या पायालाही एक गोळी लागली आणि त्या देखील गंभीर जखमी झाल्या आहेत. झाली. सध्या त्यांची पत्नी आणि मुलीची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, ही घटना घडल्यानंतर लगेचच घटनास्थळी पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान आणि लष्कराच्या संयुक्त पथक घटनास्थळी पोहोचलं आहे. तसेच ही घटना ज्या ठिकाणी घडली तेथील परिसराला पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवानांनी वेढा घातला असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरु करण्यात आलं आहे.