पीटीआय मुंबई
दहशतवाद्यांच्या भीतीने आम्ही तंबूत शिरलो. त्यांनी माझे ५४ वर्षीय वडील संतोष यांना बाहेर बोलावून कुराणातील ओळी (कलमा) म्हणण्यास सांगितले. त्यांनी जेव्हा म्हटल्या नाहीत तेव्हा त्यांना डोक्यात, पाठीत व कानात गोळ्या घातल्या असे २६ वर्षीय आसावरी जगदाळे यांनी वृत्तसंस्थेला हल्ल्याच्या वेळचा अनुभव सांगितला. तसेच तुम्ही मोदींना पाठिंबा देता असे सांगत गोळ्या झाडल्याचे त्यांनी नमूद केले.
पुण्यातील उद्याोजक संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाला या घटनेने धक्का बसला. वडील जमिनीवर कोसळल्यावर त्यांच्या शेजारी असलेल्या काकांनाही गोळ्या घातल्या. आम्ही पाच जण होतो. आसावरी या मनुष्यबळ विकास संसाधन क्षेत्रात कार्यरत आहेत. स्थानिक पोलिसांप्रमाणे हल्लेखोरांचा वेश होता. संरक्षणासाठी आम्ही शेजारच्या तंबूत गेल्याचे आसावरी यांनी नमूद केले. आमच्याप्रमाणे सहा ते सात पर्यटक देखील पडून राहिले. आम्हाला सुरुवातीला दहशतवादी व सुरक्षारक्षक यांच्यात ही चकमक सुरू आहे असे वाटले. दहशतवाद्यांच्या गटाने सुरुवातीला शेजारच्या तंबूत येत गोळीबार केला. त्यानंतर आमच्या तंबूकडे येत माझ्या वडिलांना चौधरी तू बाहर आ जा असे दरडावल्याचे आसावरी यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देत असल्याबद्दल शेरेबाजी केली. पाठोपाठ काश्मिरी दहशतवादी निरपराध महिला व मुलांना ठार नाहीत असा दावा केला. नंतर माझ्या वडिलांना कुराणातील ओळी (कलमा) म्हणण्यास सांगितले. त्यात अपयश आल्यावर तीन गोळ्या त्यांच्यावर झाडल्या. अनेक पुरुषांना त्यांनी गोळ्या घातल्या. तेथे मदतीसाठी कोणीही नव्हते. पोलीस किंवा लष्कराचे जवान २० मिनिटांनी आल्याचे आसावरी यांनी सांगितले.
ज्या व्यक्ती आम्हाला तेथे घेऊन गेल्या त्यांनी आम्हाला परतण्यास मदत केली. आमची वैद्याकीय तपासणी करण्यात आली. आम्हाला पहेलगाम क्लब येथे हलविण्यात आले. दुपारी साडेतीन वाजता हल्ला झाला. मात्र पाच तासांनंतर माझे वडील किंवा काकांबद्दल काहीही माहिती देण्यात आली नाही, असे आसावरी यांनी सांगितले.
पनवेलमधील एकाचा मृत्यू
पनवेल येथील निसर्ग ट्रॅव्हल्स कंपनीच्या माध्यमातून ३९ पर्यटकांचा एक चमू पहेलगाम येथील दहशतवाद्यांच्या गोळीबारात सापडला. यात नवीन पनवेल येथे राहणारे दिलीप देसले यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच सुबोध पाटील आणि त्यांच्या पत्नी माणिक हे दाम्पत्यदेखील जखमी झाले आहे. माणिक यांची प्रकृती खालावल्याने त्यांना श्रीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.