राजकीय हिंसाचारात २२ जणांचा मृत्यू
पाकिस्तानात होऊ घातलेल्या केंद्रीय निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर प्रचाराच्या सर्वपक्षीय मोहिमांनी जोर पकडला आहे. मात्र या प्रचारदौऱ्यांवर बलुचिस्तान आणि खौबर-पख्तुनख्वा भागात दहशतवाद्यांनी केलेल्या विविध हल्ल्यांत मंगळवारी २२ जण ठार आणि अनेक लोक जखमी झाले. यामुळे या निवडणुकांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. गेल्या तीन दिवसांत प्रचारसभा अथवा प्रचाराशी संबंधित व्यक्तींवर झालेला हा पाचवा दहशतवादी हल्ला आहे.
मंगळवारी दुपारी पीएमएल-एन् या पक्षाचे नेते सनाउल्लाह झेहरी यांच्या प्रचारवाहनावर बॉम्बस्फोट हल्ला करण्यात आला. यामध्ये ६ जण ठार, तर ३० जण जखमी झाले. या हल्ल्यातून झेहरी जरी सुखरूप बचावले असले तरी, त्यांचा मुलगा, भाऊ आणि भाचा मात्र मृत्युमुखी पडले.
अन्य एका घटनेत, पेशावर शहराच्या वायव्येकडे अवामी नॅशनल पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांवर तालिबान्यांकडून आत्मघातकी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यांत १६ जण ठार झाले तर ५० हून अधिक लोक जखमी झाले. पाकिस्तानातील बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या आत्मघातकी हल्ल्यासाठी किमान ६ किलो स्फोटके आणि बॉल बेअरिंग्ज वापरण्यात आले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानात बंदी घालण्यात आलेल्या तेहरीक ए तालिबान पाकिस्तानने घेतली आहे.