मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात-उल-दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद सध्या पाकिस्तानच्या ताब्यात आहे. तो पाकिस्तानमधल्या तुरुंगात ७८ वर्षांची शिक्षा भोगतोय, अशी माहिती संयुक्त राष्ट्रसंघाने दिली आहे. यूएनने म्हटलं आहे की, हाफिज सईद हा दहशतवादी १२ फेब्रुवारी २०२० पासून शिक्षा भोगतोय. त्याला ७८ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. टेरर फंडिंगच्या (दहशतवादी कारवायांसाठी पुरवले जाणारे पैसे) सात वेगवेगळ्या प्रकरणांमध्यो त्याला दोषी ठरवण्यात आलं आहे. दुसऱ्या बाजूला भारताच्या अनेक तपास यंत्रणा आणि गुप्तचर संस्था गेल्या अनेक वर्षांपासून हाफिजच्या मागावर आहेत.
दहशतवादी कारवायांमधील सहभाग आणि त्यासाठी अर्थसहाय्य केल्याप्रकरणी हाफिज सईदला पाकिस्तानमध्ये दोषी ठरवण्यात आलं आहे. हाफिज सईदला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने जागतिक दहशतवादी घोषित केलं आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने गेल्या महिन्यात अल-कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित काही नोंदींमध्ये बदल केले आहेत. यामध्ये दहशतवादी संघटना, त्यांचे सदस्य, सपंत्ती, त्यांच्यावरील बंदी, त्यांच्याकडे असणाऱ्या शस्त्रास्रांबाबतची माहिती अपडेट केली होती. त्यामधून हाफिज सईदबाबतची माहिती मिळाली आहे. सईदबाबत यूएनने म्हटलं आहे की, दहशतवादी हाफिज सईद टेरर फंडिंगच्या ७ प्रकरणांमध्ये दोषी आढळला आहे आणि तो सध्या तुरुंगात ७८ वर्षांची शिक्षा भोगतोय.
हे ही वाचा >> “…म्हणून कारसेवकांवर गोळीबाराचे आदेश दिले होते”, सपा नेत्याने सांगितलं ३० वर्षांपूर्वी नेमकं काय घडलेलं?
दरम्यान, यूएनने लष्कर-ए-तैय्यबा या दहशतवादी संघटनेच्या संस्थापकांपैकी एक हाफिज अब्दुल सलाम भुट्टावीला मृत घोषित केलं आहे. भुट्टावी याचा मे २०२३ मध्ये पाकिस्तानमधील तुरुंगात हुदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. भुट्टावी हा २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी एक होता. भुट्टावी टेरर फंडिंगप्रकरणात दोषी आढळा होता. त्यानंतर त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. पंजाब प्रांतातील शेखपुरा तुरुंगात शिक्षा भोगत असताना त्याचा मृत्यू झाला.