पीटीआय, जम्मू

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘हिजबुल मुजाहिदीन’ या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचा दीर्घकाळ सक्रिय असलेला दहशतवादी जहांगीर सरूरी याचा जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात दुर्गम उंच भागातील छुपा अड्डा सुरक्षा दलांनी मंगळवारी शोधून काढला आणि उद्ध्वस्त केला. हे सुरक्षा दलांच्या दहशतवादविरोधी मोहिमेचे मोठे यश मानले जात आहे.

किश्तवाडचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक खलील पोसवाल यांनी सांगितले, की राष्ट्रीय रायफल्स आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्याच्या सहकार्याने पोलिसांनी भडत सरूरच्या परिबाग भागात अतिशय काळजीपूर्वक राबवलेल्या या मोहिमेत हा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला. सरूरी १९९० पासून दहशतवादी कारवाया करत होता. तो किश्तवाड जिल्ह्यातील दुर्गम उंचीवरील भागात लपला होता. त्याचा भाऊ अब्दुल करीम बट्टला दहशतवाद्यांशी संबंधित असल्याच्या आरोपाखाली सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत ३ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली आहे. सरूरी या ठिकाणी लपून विध्वंसक कारवायांची योजना आखत असल्याचा संशय आहे. या अड्डय़ात दोन ब्लँकेट, काही खाद्यपदार्थ आणि वैयक्तिक वापराच्या वस्तू पोलिसांनी जप्त केल्या. यावरून येथे त्याचे वास्तव्य असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अवैध कारवायांना आळा घालण्यासाठी या मोहिमेचे महत्त्व अधोरेखित होते, असेही पोसवाल यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Terrorist hideout destroyed by security forces amy