Hamas Meet In Pakistan : पाकव्याप्त काश्मीरमध्ये नुकतेच काश्मीर एकता दिनानिमित्त पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांची बैठक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाच्या वरिष्ठ कमांडरसह हमासचे वरिष्ठ प्रतिनिधीही सहभागी झाले होते. “काश्मीर सॉलिडॅरिटी अँड हमास ऑपरेशन ‘अल अक्सा फ्लड’ कॉन्फरन्स” असे या बैठकीचे नाव होते. ही बैठक रावळकोट येथील शहीद साबीर स्टेडियममध्ये पार पडली. या बैठकीच्या प्रमुख उपस्थितांमध्ये जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचा भाऊ तल्हा सैफ, जैश-ए-मोहम्मदचा कमांडर असगर खान काश्मिरी आणि लष्कर-ए-तोयबाच्या सदस्यांचा समावेश होता.

दरम्यान या बैठकीत, हमासचा इराणमधील प्रतिनिधी डॉ. खालिद अल-कदुमीनेही भाग घेतला होता. त्याचा पीओकेचा हा पहिलाच दौरा होता. या पैठकीत हमासशी संबंधित अनेक पॅलेस्टिनी नेते देखील उपस्थित होते. अल-कदुमीने जमियत उलेमा-ए-इस्लामचा प्रमुख मौलाना फजलुर रहमान याच्याशीही स्वतंत्र बैठक घेतली. याबाबत इंडिया टुडेने वृत्त दिले आहे.

या बैठकीमुळे पाकिस्तानची दहशतवादी कारवायांना सतत पाठिंबा देण्याची भूमिका पुन्हा उघड झाली आहे. जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा या दोन्ही संघटनांनी भारतावर अनेक दहशतवादी हल्ले केले आहेत, ज्यात २००१ मधील संसदेवरील हल्ला, २००८ मधील मुंबईवरील हल्ला आणि २०१९ मधील पुलवामा हल्ल्याचा समावेश आहे.

गेल्या काही वर्षांपासून इस्रायलशी लढत असलेल्या हमास या पॅलेस्टिनी दहशतवादी संघटने आपल्या कारवाया आतापर्यंत मध्य पूर्वेपुरत्या मर्यादित ठेवल्या आहेत. मात्र, पाकिस्तानातील बैठकीतील त्यांच्या सहभागामुळे पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांशी त्यांचे संबंध वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हमासच्या नेत्यांनी यापूर्वी काश्मीरमधील कथित मानवी हक्कांच्या उल्लंघनाबद्दल विधाने केली आहेत. गुप्तचर सूत्रांनी यापूर्वी दक्षिण आशियातील कट्टरपंथी घटकांशी हमासच्या संभाव्य संबंधांबद्दल इशारा दिला आहे.

Story img Loader