हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर सबझार अहमद भारतीय लष्कराविरुद्धच्या चकमकीत एकही गोळी झाडू शकला नसल्याची माहिती समोर आली आहे. लष्कराविरुद्धच्या चकमकीत सबझार अहमद १० तास लपून बसला होता. मात्र त्याने कोणताही प्रतिकार केला नाही, अशी माहिती लष्करातील सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे सबझार अहमद फक्त सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंसाठीच हातात रायफल घ्यायचा का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर सबझार अहमद शनिवारी (२७ मे) लष्कराविरुद्धच्या चकमकीत मारला गेला. काश्मीरमधील तरुणांची दिशाभूल करुन त्यांना दहशतवादाच्या मार्गावर नेण्याचे काम सबझार अहमद करत होता. सबझार अनेकदा हातात रायफल घेऊन हिजबुल मुजाहिद्दीनकडून व्हायरल केल्या जाणाऱ्या फोटोंमध्येही दिसला. मात्र दक्षिण काश्मीरमधील त्रालमध्ये चकमक सुरु असताना सबझारला एकही गोळी झाडता आला नाही. इंडिया टुडेने चकमकीवेळी घटनास्थळी असलेल्या लष्करी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

सबझार अखेरच्या क्षणी १० तास लपून बसला होता. या दरम्यान त्याने एकही गोळी झाडली नाही. यावेळी त्याने पळून जाण्याचे बरेच प्रयत्न केले. यासाठी त्याने मोबाईलवरुन अनेक संदेशदेखील पाठवले. घटनास्थळी दगडफेक करणारे लोक पोहोचतील आणि त्यानंतर पळ काढता येतील, असा सबझारचा मानस होता. मात्र सबझारचे प्रयत्न अपुरे पडले आणि भारतीय लष्कराने त्याला कंठस्नान घातले.

त्रालच्या जंगलात लपलेल्या सबझारचा ठावठिकाणा सुरक्षा दलांना जम्मू काश्मीर पोलिसांच्या गुप्तचर विभागाकडून समजला होता. ‘पोलिसांकडून मिळालेल्या माहितीमुळे सबझार आणि त्याचा साथीदार फैजान साइमोह गावातील घरात लपला असल्याचे समजले. यानंतर शुक्रवारी या घरांना वेढा घालण्यात आला,’ अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली. या ऑपरेशनमध्ये लष्करासोबतच स्पेशल ऑपरेशन ग्रुप आणि राज्य पोलीस दलदेखील सहभागी झाले होते.

सबझार आणि फैजान लपलेल्या भागाला वेढा घातल्यावर जवानांनी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी कोणतेही प्रत्युत्तर दिले नाही. सबझार आणि फैजान त्यांचा ठावठिकाणा लपवण्याचा प्रयत्न करत होते. विशेष म्हणजे सबझार आणि फैजानकडे एके-४७ सह मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांचा साठा होता. मात्र सबझार आणि फैजानला जवानांना प्रत्युत्तर देण्याचे धाडस करता आले नाही.

Story img Loader