जम्मू-काश्मीरमधील बडगाममधील चदूरा येथील तहसील कार्यालयात दहशतवाद्यांनी एका सरकारी कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी कार्यालयात घुसले आणि त्यांनी राहुल भट्ट नावाच्या कर्मचाऱ्यावर गोळीबार केला. जखमी अवस्थेत त्यांना श्रीनगरच्या एसएमएचएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादम्यान त्यांचा मृत्यू झाला. राहुल काश्मिरी पंडित असल्याचे सांगण्यात येत आहे. सुरक्षा दल दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत.
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी या घटनेचा निषेध केला आहे. ते म्हणाले, “राहुल भट्ट यांच्यावरील प्राणघातक दहशतवादी हल्ल्याचा मी निषेध करतो. राहुल हा चडूरा येथील तहसील कार्यालयात काम करणारा सरकारी कर्मचारी होता. जिथे त्याच्यावर हल्ला झाला. हत्या सुरूच असून भीतीचे वातावरण वाढत आहे. राहुल यांच्या कुटुंबीयांना माझ्या मनःपूर्वक संवेदना.
दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांचे ऑपरेशन सुरू
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांचे ऑपरेशन सुरू आहे. बुधवारीच बांदीपोराच्या साळिंदरच्या जंगलात सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता. याआधी मंगळवारी अनंतनाग जिल्ह्यातील डुरू भागातील क्रेरी येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले होते.