जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे छुपे आणि भ्याड हल्ले सुरूच आहेत. शनिवारी श्रीनगरच्या पांथा चौकात सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. ज्या हल्ल्यात सीआरएफचे पोलीस उप निरीक्षक शहीद झाले आहेत. तर दोन जवान जखमी झाले आहे. यानंतर प्रत्युत्तरादाखल केंद्रीय राखीव पोलीस दलानेही गोळीबार केला. ज्यानंतर दहशतवादी डीपीएस शाळेत घुसले आणि त्यांनी शाळेचा ताबा घेतला. त्यानंतर पोलिसांनी या शाळेला वेढा दिला. या दहशतवाद्यांविरोधात पोलिसांची कारवाई सुरू आहे.

दहशतवाद्यांनी ज्या शाळेत घुसखोरी केली आहे, त्या शाळेत एकही विद्यार्थी आणि शिक्षक नाहीये ही समाधानाची बाब आहे. नाहीतर दहशतवाद्यांनी त्यांना ओलीस ठेवले असते. आर्मी कँट भागात हा हल्ला झाला आहे. वर्षभरात तिसऱ्यांदा श्रीनगरवर दहशतवादी हल्ला झाला आहे. याआधी पुलवामामध्ये झालेल्या चकमकीत लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे तीन दहशतवादी मारले गेले होते.

लष्करचा कमांडर जुनैद मट्टू याला सैन्यदलाने ठार केल्यापासून दहशतवादी आणखी बिथरले आहेत. त्याचमुळे ते राखीव दलाच्या तुकड्या आणि जवानांवर हल्ले करत आहेत. गुरुवारी श्रीनगरमध्येच डीएसपी मोहम्मद अयूब पंडित यांना दगडाने ठेचून मारण्याची धक्कादायक घटना घडली होती. आता याच भागात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला आहे. ज्यात पोलीस उपनिरीक्षक शहीद झाले आहेत.

Story img Loader