भारतीय उपखंडावर लक्ष केंद्रीत करत ‘अल- कायदा’ या दहशतवादी संघटनेने भारतातील सुरक्षा दलांचे कार्यालय आणि कट्टर हिंदूत्ववादी संघटनेच्या नेत्यांना टार्गेट करणार असल्याची धमकी अल कायदाने दिली आहे. ‘काश्मीरमधील तरुणांची हत्या करणारे लष्करी अधिकाऱ्यांना टार्गेट करा’ असे अल कायदाने म्हटले आहे. याच बरोबर त्यांनी सर्वसामान्य हिंदू, बौद्ध किंवा मुस्लिमांना लक्ष्य करु नका असे म्हटले आहे.
‘टाइम्स ऑफ इंडियाने’ दिलेल्या वृत्तानुसार अल-कायदाने भारतीय उपखंडातील शाखेतील दहशतवाद्यांसाठी एक पत्रक जारी केले आहे. यामध्ये संघटनेचे ध्येय, लक्ष्य आदी विषयांवर माहिती देण्यात आली आहे. ‘सैन्यातील प्रत्येक जण आपले लक्ष्य आहे. मग ते युद्धाच्या मैदानात असो किंवा त्यांच्या तळांमधील बॅरेकमध्ये असो’ असे या पत्रकात म्हटले आहे. ‘लष्करी अधिकारी हे आपले मुख्य टार्गेट असून जेवढा वरिष्ठ अधिकारी त्यांना जास्त प्राधान्य हेच निकष असेल. काश्मीरमधील तरुणांना ठार मारणारे अधिकाऱ्यांना लक्ष्य करावे’ असे या पत्रकात म्हटले आहे.
उत्तर प्रदेशमधील मौलाना असिम उमर हे भारतीय उपखंडातील अल कायदाचे प्रमुख असतील असे या पत्रकातून स्पष्ट करण्यात आले. सर्वसामान्य हिंदू, बौद्ध किंवा मुस्लिमांना टार्गेट करु नका किंवा त्यांच्या प्रार्थनास्थळावर हल्ला करु नका असा महत्त्वपूर्ण उल्लेखही अल कायदाने केला आहे. अल कायदासमोर सध्या आयसिसचे आव्हान असून त्यामुळेच अल कायदाच्या भूमिकेत बदल झाला असावा असे जाणकार सांगतात. आयसिसने प्रामुख्याने मशिदींना लक्ष्य केले होते. भारतीय गुप्तचर यंत्रणा या घटनांवर लक्ष ठेवून आहे. हिज्बुल कमांडर झाकिर मुसाने नवीन दहशतवादी संघटनेची स्थापना केली असून या संघटनेला अल कायदाने पाठबळ दिल्याचे समजते. यासंदर्भातही गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी माहिती घेत आहेत. पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमार या देशांमध्ये कोणाला टार्गेट करायचे याची माहितीही या पत्रकांमध्ये देण्यात आली आहे.
गुप्तचर यंत्रणेच्या दृष्टीने डोकेदुखी वाढवणारी आणखी एक गोष्ट या पत्रकात आहे. अल कायदाने भारतीय उपखंडातील विविध दहशतवादी संघटनांना अल कायदाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. उपखंडातील प्रत्येक देशातील सुरक्षा यंत्रणा आणि संघटनेविरोधात आपण उभे राहिले पाहिजे. यातूनच आपण इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तानची निर्मीती शक्य होईल असे अल कायदाने म्हटले आहे.