Israel – Palestine News in Marathi : पॅलस्टाईनच्या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर शनिवारी अडीच हजारांहून अधिक रॅकेट्स डागून युद्धाला तोंड फोडलं. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धामुळे दोन्ही देशांतील १६०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, मोठ्या प्रमाणात वित्तहानीही झाली आहे. रस्त्यांवर मृतदेहांचा खच पडला असून चहुबाजूंनी केवळ गोळीबाराचा आवाज येत असल्याचं तेथील नागरिक सांगत आहेत. या दरम्यान, इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेने एक महत्त्वाचं ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी मुंबईत २६/११ झालेल्या दहशतवादी हल्ल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.
हेही वाचा >> युद्धाच्या चौथ्या दिवशी इस्रायलच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन, काय झाली चर्चा? मोदी म्हणाले…
“पाहिल्याशिवाय किंवा चौकशी केल्याशिवाय कोणत्याही दहशतवाद्याला समजून घेणं एखाद्या माणसासाठी कठीण आहे. मुंबई, इंडिया हॉटेल आणि चबड सेंटरवर झालेला दहशतवादी हल्ला आठवतो? दहशतवादी हे रक्तपिपासू प्राणी असतात”, असं ट्वीट मोसादने केलं आहे.
मोदास ही इस्रायलची गुप्तचर यंत्रणा आहे. इस्रायलमधील दहशतवादी कृत्ये, संघटनांरव मोसादचं लक्ष असतं. अशा संघटनांवर मोसादकडून कारवाईही केली जाते. हमासकडून होत असलेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड मोहम्मद दीफ आहे. मोहम्मद दीफ हा नवा ओसामा बिन लादेन असल्याचंही इस्रायलचं म्हणणं आहे. त्याला मारण्याकरता मोसादने आतापर्यंत सातवेळा प्रयत्न केले. पण प्रत्येकवेळी त्याला संपवण्यात मोसादला अपयश आलं आहे. मोहम्मद दीफला पकडण्यासाठी मोसादकडून गेली कित्येक वर्षे प्रयत्न सुरू आहेत. पण मोसादच्या जाळ्यातून तो सातत्याने निसटून जातो. धक्कादायक म्हणजे, तो अपंग आहे. स्वतःच्या पायावरही उभा राहू शकत नाही. तरीही तो मोसादच्या तावडीतून सुटतो.