सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणाऱया दहशतवाद्यांपैकी एकाला जिवंत पकडण्यात बुधवारी यश आले. मुंबईवर हल्ला करणाऱया अजमल कसाबनंतर पहिल्यांदाच अशा पद्धतीने दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश आले आहे. कासीम खान असे पकडलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. स्थानिक लोकांच्या प्रयत्नांमुळे कासीम खानला पकडण्यात पोलीसांना यश आले.
सीमा सुरक्षा दलाच्या जवानांचे पथक निघालेल्या गाडीवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात बुधवारी सकाळी दोन जवान शहीद झाले. या हल्ल्यात आठ जवान जखमी झाले आहेत. समरोलीजवळ नरसू नल्ला येथे ही घटना घडली. दोन हल्लेखोरांपैकी एकाला जागीच ठार मारण्यात आले होते.
सीमा सुरक्षा दलाचे जवान जम्मूहून श्रीनगरच्या दिशेने निघाले होते. उधमपूर रस्त्यावर दहशतवाद्यांनी त्यांच्या गाडीवर अचानक गोळीबार करण्यास सुरुवात केली. यावेळी गाडीच्या दिशेने ग्रेनेडही फेकण्यात आले. गोळीबाराला सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी लगेचच प्रत्युत्तर दिले. त्यामुळे एका दहशतवाद्याला जागीच ठार मारण्यात आले. हल्ला अचानक झाल्यामुळे दोन जवानांना गोळ्या लागून ते शहीद झाले, तर आठ जण जखमी झाले. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या हल्ल्यानंतर लष्कराच्या जवानांनी आणि पोलीसांनी संपूर्ण परिसर रिकामा केला आणि पळून गेलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. कासीम खान हा जवळच्या एका गावामध्ये पळून गेला. तिथे एका घरामध्ये लपून त्याने पाच जणांना ओलीस ठेवले. मात्र, त्यातील दोघांनी स्वतःची सुटका करून घेतली. यानंतर बिथरलेल्या कासीमने दोघांना बंधक बनवून जंगलाच्या दिशेने पळ काढला. यानंतर बंधक बनवलेल्यांपैकी एकाने त्याचे पाय धरले. तर दुसऱयाने बंदुक धरून कासीमला पकडले. यानंतर पोलीसांना त्या दिशेने बोलावून घेण्यात आले आणि त्याला पोलीसांच्या हवाली करण्यात आले.
नऊ दिवसांपूर्वीच पंजाबमधील दिनानगरमध्ये अशाच पद्धतीने तीन दहशतवाद्यांनी पोलीस ठाण्यावर हल्ला केला होता. त्यामध्ये एका पोलीस अधीक्षकाला वीरमरण आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा