Terrorist Attack On Pakistan Train: पाकिस्तानमध्ये एका प्रवासी रेल्वेवर दहशतवादी हल्ला झाला असून, हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात रेल्वे चालक जखमी झाला आहे. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जाफर एक्सप्रेस नावाची ही रेल्वे बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा येथून खैबर पख्तुनख्वा येथील पेशावर येथे जात होती. याच्या नऊ डब्यांमध्ये सुमारे ४०० प्रवाशी होते. याबाबत रॉयटर्स या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.

बलूच लिबरेशन आर्मी या फुटीरतावादी संघटनेने एका निवेदनात या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांसह रेल्वेतील प्रवाशांना ओलीस ठेवले असल्याचे म्हटले आहे. पण, या दावांना पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी कोणताही अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

१८२ प्रवासी ओलीस

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, बलूच लिबरेशन आर्मीने दावा केला आहे की, या हल्ल्यात २० लष्करी कर्मचारी मारले गेले आहेत. बलूच लिबरेशन आर्मीने असेही म्हटले आहे की, त्यांनी १८२ प्रवाशांना ताब्यात घेतले आहे. याचबरोबर, जर पाकिस्तानने ओलीस ठेवण्यात आलेल्या प्रवाशांच्या सुटकेचा प्रयत्न केल्यास सर्वांची हत्या करण्याची धमकीही दिली आहे.

सरकारचे स्पष्टीकरण

या हल्ल्यानंतर बलुचिस्तान सरकारने आपत्कालीन उपाययोजना लागू केल्या असून, परिस्थिती हाताळण्यासाठी विविध सुरक्षा संस्थांना तैनात केल्याची माहिती सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंद यांनी दिली आहे.

“क्वेट्टाहून पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्सप्रेसवर जोरदार गोळीबार झाल्याचे वृत्त आहे,” असे बलुचिस्तान सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंद यांनी डॉन या पाकिस्तानी वृत्तपत्राला सांगितले.

बलुचिस्तान हा संसाधनांनी समृद्ध असलेला प्रांत आहे. पण, गेल्या अनेक वर्षांपासून तिथे संघर्ष सुरू आहे. स्वातंत्र्य आणि अधिक स्वायत्ततेची मागणी करणाऱ्या फुटीरतावादी संघटनांकडून दीर्घकाळापासून बंडखोरी सुरू आहे. अलिकडच्या काही वर्षांत या प्रदेशात सुरक्षा दलांवर, पायाभूत सुविधांवर आणि नागरिकांवर वारंवार हल्ले झाले आहेत.

वर्षभरात रेल्वेवरील हल्ले वाढले

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, पाकिस्तान रेल्वेने क्वेट्टा आणि पेशावर दरम्यानची रेल्वे सेवा दीड महिन्याहून अधिक काळ खंडीत केल्यानंतर पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली होती. गेल्या वर्षभरात बलुचिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये, क्वेट्टा रेल्वे स्थानकावर झालेल्या आत्मघातकी स्फोटात किमान २६ जण ठार आणि ६२ जण जखमी झाले होते.

Story img Loader