काश्मीरमधील दहशतवादी आता जीव मुठीत घेऊन पळू लागले आहेत, टेरर फंडिंग संबंधी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA)ज्या पद्धतीनं कारवाई करत यश मिळवलं आहे त्यामुळे दहशतवाद्याचे धाबे दणाणले आहेत, केंद्रीय अर्थमंत्री आणि संरक्षण मंत्री अरूण जेटली यांनी म्हटलं आहे. दिल्लीत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमात त्यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचाही उल्लेख केला. काश्मीरमधून दहशतवाद्यांचा संपूर्ण खात्मा करणं ही केंद्राची प्राथमिकता आहे. सैन्यदल आणि राष्ट्रीय तपास यंत्रणांमुळे दहशतावद्यांवर दबाव वाढतो आहे. तसंच नोटाबंदीमुळेही दहशतवाद्यांचे अनेक मनसुबे धुळीला मिळाले आहेत, असंही अरूण जेटली यांनी स्पष्ट केलं आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून काश्मीर खोऱ्यांमध्ये दहशतवादी आपले कट आखून तशा कारवाया करत होते , मात्र त्यांना वेसण घालण्यासाठी केंद्रानं कंबर कसली आहे, कोणताही दहशतवादी आता जास्त काळ जगू शकत नाही, तसंच दहशत पसरविण्याचा विचारही करू शकत नाही, जम्मू काश्मीर पोलीस, राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि सैन्य दल या सगळ्यांचं हे यश आहे. या सगळ्यांनी अत्यंत मेहनत घेऊन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी प्रयत्न केले आहेत असंही जेटली यांनी म्हटलं आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच पाकिस्तानला हे वाटत नाही की काश्मीर हा भारताचा हिस्सा आहे, काश्मीर भारतात असूनही पाकिस्तान त्यांच्या नापाक कारवाया थांबवत नाही, काश्मीर खोऱ्यात दहशत पसरविण्याचे काम पाकिस्तानकडून सातत्यानं होत असतं. पाकिस्तानला काहीही करून काश्मीरवर कब्जा मिळवायचा आहे मात्र त्यांचा हा मनसुबा कधीच पूर्ण होऊ शकत नाही असंही जेटली यांनी स्पष्ट केलं आहे.
आपल्या संपूर्ण भाषणात अरूण जेटली यांनी चीन आणि डोकलाम सीमेवरून निर्माण झालेल्या संघर्षाचा उल्लेख केला नाही. तसंच सीमेलगतच्या नियंत्रण रेषेवरही भारताचाच दबदबा आहे असंही जेटली यांनी म्हटलं आहे. पूर्वी एखाद्या दहशतवाद्याला ठार करण्यात आलं की हजारो लोक तिथे यायचे आणि सैन्यदलावर दगडफेक करायचे आता ही संख्या २० ते ३० लोकांच्या जमावावर आली आहे आणि काही दिवसांनी तर हे लोक येणंही बंद होणार आहे कारण काश्मीर खोऱ्यात आता मोजकेच दहशतवादी उरले आहेत आणि ते जीव मुठीत घेऊन पलायन करत आहेत असंही जेटली यांनी स्पष्ट केलं आहे.