पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये अडथळे आणण्याचा दहशतवाद्यांचा डाव आहे, अशी माहिती पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शनिवारी दिली. दहशतवाद्यांचा डाव हाणून पाडण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी दक्ष राहावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
राजधानीत सुरू असलेल्या सर्व राज्यांच्या पोलीस महासंचालक व महानिरीक्षकांच्या परिषदेत पंतप्रधान बोलत होते. लष्कर-ए-तय्यबा ही दहशतवादी संघटना हल्ले घडवून आणू शकते. गेल्या काही दिवसांत अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून याबाबतची माहिती मिळत आहे. त्यामुळे गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणांनी दक्ष राहणे गरजेचे आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
मुझफ्फरमधील दंगली वैयक्तिक स्वार्थासाठी पेटवल्या गेल्या. किरकोळ कारणे आणि स्थानिक मुद्दय़ावरून धार्मिक दंगली पेटणार नाहीत, याकडे पोलिसांनी लक्ष दिले पाहिजे. या वर्षांत अनेक राज्यांमध्ये धार्मिक दंगली घडल्या. या राज्यांच्या विकासासाठी या दंगली घातक आहेत. त्यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे, असे पंतप्रधान म्हणाले. राज्यांच्या पोलीस महासंचालकांनी याची जबाबदारी घेऊन राज्यात धार्मिक दंगली घडणार नाहीत अशी खात्री द्यावी, असेही त्यांनी सांगितले.
नक्षलवादी हल्ले वाढले असल्याबाबतही पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली. सुरक्षा यंत्रणांनी नक्षलवादी हल्ले रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये कसूर करू नये. गुप्तचर संघटना, पोलीस, निमलष्करी दल यांनी छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीच्या मतदानावेळी नक्षलग्रस्त भागांमध्ये चांगले काम केल्याचे कौतुकही पंतप्रधानांनी केले.
महिलांच्या सुरक्षेसाठी संस्थात्मक यंत्रणेची गरज
बलात्कार आणि महिलांवरील वाढीव गुन्हय़ांच्या पाश्र्वभूमीवर महिला आणि बालके यांच्या सुरक्षेसाठी संस्थात्मक यंत्रणा उभारण्यात येईल, अशी ग्वाही पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शनिवारी दिली. देशातील पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या परिषदेत पंतप्रधान बोलत होते. गेल्या वर्षी नवी दिल्लीत बसमध्ये एका तरुणीवर झालेल्या बलात्कार व खून प्रकरणामुळे महिलांच्या सुरक्षेविषयी तातडीने पावले उचलली गेली. मात्र या प्रकरणानंतर महिलांवरील गुन्हय़ांवर नियंत्रण मिळवण्यासाठी जनतेकडून अपेक्षा वाढल्या आहेत, हे पोलिसांनी ध्यानात घ्यावे, असे पंतप्रधान म्हणाले. गुन्हय़ांवर नियंत्रण मिळविण्यासाठी संस्थात्मक यंत्रणेची गरज आहे. राज्यांच्या पोलीस महासंचालकांनी त्यांच्या राज्यात या यंत्रणेचे नेतृत्व करावे, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. मात्र ही यंत्रणा काय असेल याची विस्तृत माहिती पंतप्रधानांनी दिली नाही.
निवडणुकीत अडथळे आणण्याचा दहशतवाद्यांचा डाव
पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये अडथळे आणण्याचा दहशतवाद्यांचा डाव आहे
First published on: 24-11-2013 at 02:11 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Terrorists may attempt to disrupt lok sabha assembly polls pm