दोन अतिरेक्यांची जंगलामध्ये कोंडी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एक्स्प्रेस वृत्त, कोकरनाग (अनंतनाग) : जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात दडून बसलेल्या अतिरेक्यांसाठी मोठी शोधमोहीम उघडण्यात आली आहे. लष्कर-ए- तोयबाच्या दोन अतिरेक्यांसह एका स्थानिक दहशतवाद्याची कोंडी करण्यात यश आल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांनी गुरुवारी सांगितले. दरम्यान, बुधवारच्या हल्ल्यात शहीद झालेल्यांचे मृतदेह श्रीनगर येथे नेण्यात आले आहेत.

बुधवारी अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग येथे अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे कर्नल मनप्रित सिंह, मेजर आशिष धोंचक, पोलीस उपाधीक्षक हुमायूँ भट यांच्यासह लष्कराच्या एका जवानाला वीरमरण आले होते. त्यानंतर गुरूवारी लष्कर आणि पोलिसांनी जंगलामध्ये लपून बसलेल्या अतिरेक्यांसाठी सुरू केलेली शोधमोहीम अधिक तीव्र केली. अतिरेक्यांची कोंडी करण्यात यश आल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांनी ‘एक्स’ समाजमाध्यमाद्वारे जाहीर केले.

हेही वाचा >>> लष्करी अधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गर्दी; पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याची मागणी

लष्कर ए तोयबाच्या दोन अतिरेक्यांबरोबर उझेर खान हा स्थानिक अतिरेकी असून त्यांना चारही बाजूंनी वेढण्यात सुरक्षा रक्षकांना यश आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरूवारी अंधार पडल्यानंतर मोहीम तात्पुरती थांबविण्यात आली असली, तरी जंगलातून बाहेर पडणाऱ्या सर्व वाटांवर प्रकाशझोत सोडून सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी शोधमोहीम पुन्हा सुरू करण्यात येईल.

पाकिस्तानविरोधी निदर्शने

दरम्यान, बुधवारी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना वीरमरण आल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशभरात संतापाची लाट आहे. जम्मूसह अनेक शहरांमध्ये नागरिकांनी रस्त्यावर येऊन पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

शहिदांना मानवंदना

बुधवारच्या हल्ल्यातील शहिदांचे मृतदेह विमानाने श्रीनगर येथे आणल्यानंतर गुरूवारी नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासह लष्कर आणि पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना मानवंदना दिली. देश या वीरपुरुषांचा कायम ऋणी राहील, अशी प्रतिक्रिया सिन्हा यांनी यावेळी व्यक्त केली.

काय घडले?

शोधमोहिमेदरम्यान बुधवारी कर्नल सिंह आणि मेजर धोंचक एका उंच कडय़ावर असताना अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळय़ा झाडल्या. गोळय़ा लागल्यामुळे हे दोघे दरीमध्ये कोसळले. त्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी गिर्यारोहकांची मदत घ्यावी लागली. पोलीस उपाधीक्षक भट जखमी अवस्थेत आढळून आले. श्रीनगरला नेले जात असताना त्यांच्या मृत्यू झाला. या चकमकीनंतर लष्कराने मोठी शोधमोहीम सुरू केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Terrorists seraching army massive search operation in kashmir anantnag ysh