Tesla Car Crashes Catches Fire : जगभरात दररोज कितीतरी अपघात घडल्याच्या घटना समोर येतात. काही अपघाताच्या घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील होतात. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अनेकदा काही घटना इतक्या भयानक असतात की ते पाहून आपल्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. अनेकवेळा गाडी चालवताना चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलेलं असतं तर अनेकदा भरधाव वेगाने धावणाऱ्या एखाद्या गाडीने दुसऱ्या एखाद्या गाडीला धडक दिल्याच्या घटना समोर येतात. आता अशीच एक भीषण अपघाताची घटना फ्रान्समध्ये घडली आहे.
एक भरधाव वेगाने जाणारी कार रस्ता दुभाजकावर लावण्यात आलेल्या साईन बोर्डवर आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की, भरधाव वेगाने जाणाऱ्या कारचा चक्काचूर होऊन आग लागली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना फ्रान्समध्ये घडली असून पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून या घटनेची अधिक चौकशी करण्यात येत असून माहितीनुसार ही कार टेस्ला कंपनीची होती. यासंदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
हेही वाचा : Lawrence Bishnoi : सलमान खानप्रमाणे ‘हे’ १० जण बिश्नोई टोळीच्या निशाण्यावर, NIA समोर लॉरेन्सनेच दिलेली कबुली
दरम्यान, पोलिसांच्या माहितीनुसार, फ्रान्समध्ये एका कार अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. टेस्लाच्या वाहनाने रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या एका बोर्डवर जोराची धडक दिली आणि त्यानंतर लगेच त्या गाडीला आग लागली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निओर्ट शहराजवळ शनिवारी रात्री झालेल्या अपघाताची नेमकी परिस्थिती अद्याप निश्चित करणे बाकी असून तपास सुरू आहे. ही घटना घडली त्यावेळी त्या ठिकाणी कोणीही प्रत्यक्षदर्शी नव्हते. त्यामुळे या हा अपघात नेमकी कसा झाला, याबाबतची माहिती घेतली जात आहे. यामधील गाडी चालकासह आणखी तीन जणांचा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांची देखील ओळख पटवण्याचं काम सुरु असल्याची माहिती सांगितली.
दरम्यान, सामान्यतः टेस्ला कंपनीची वाहने खूपच सुरक्षित मानली जातात. मात्र, या अपघातामुळे कारच्या सेफ्टी रेटिंगवर प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र, अपघाताबाबत कार कंपनीकडून अद्याप कोणतेही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. फ्रेंच मीडियाच्या वृत्तानुसार, या अपघाताचा कोणीही प्रत्यक्षदर्शी सध्या सापडलेला नाही. पोलीस घटनास्थळी आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. मात्र, असं सांगितलं जात आहे की, अपघातादरम्यान कार खूप वेगाने जात होती. जेव्हा ती कार रस्त्यावर आदळली तेव्हा त्यातील सेन्सर्सने काम करणे बंद केले असं म्हटलं जात आहे.