Textile Minister केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी Smriti Iranis पुन्हा एकदा अडचणीत आल्या आहेत. स्मृती इराणी यांचे पती झुबीन यांच्यावर मध्य प्रदेशमधील उमारिया जिल्ह्यातील एका शाळेची जमीन लाटल्याचा आरोप आहे. शाळेच्या मुख्याध्यापकाने केलेल्या तक्रारीनंतर जिल्हा प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, स्मृती इराणी यांनी सर्व आरोप फेटाळले असून त्यांनी उमारिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिषेक सिंग यांना पत्र लिहून निष्पक्ष चौकशी करण्याची विनंती केली आहे.

जमिनीच्या एका तुकड्याबाबत हा वाद असल्याचे स्मृती इराणी यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. जमिनीचा एक भाग कुचवाही प्राथमिक शाळेच्या नावावर तर दुसरा भाग हा खासगी नावाने होता. त्या व्यक्तीने ती जमीन विकली, अशी माहिती इराणी यांनी दिली.

स्मृती इराणींचे पती झुबीन हे भागिदार असलेल्या कंपनीने २०१६ रोजी पाच एकर जागा घेतली. खरेदी केलेल्या जागेवर त्यांनी कुंपण घातले. कुंपण घालतेवेळी त्यांनी या जमिनीलगत असलेल्या शाळेच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप शाळेचे मुख्याध्यापक जानकीप्रसाद तिवारी यांनी केल्याचे वृत्त स्थानिक वृत्तपत्रांनी दिले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र आपल्यापर्यंत तक्रारच आली नसल्याचे सांगत हात वर करण्याचे प्रयत्न केले. सकृतदर्शनी किती जागा शाळेची व जमीन मालकाची आहे, हे स्पष्ट झालेले नाही. तोच वादाचा मुद्या असल्याचे जिल्हाधिकारी सिंग यांनी सांगितले. जागेवर कब्जा केलेल्या कंपनीचे झुबीन हे भागिदार आहेत काय, असा सवाल सिंग यांना विचारले असता त्यांनी आम्हाला फक्त जागेची कागदपत्रे पाहण्याचा अधिकारी असून कंपनीच्या मालकीबाबत काही माहीत नसल्याचे म्हटले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी जागेसंबंधीचे स्थानिक वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांचे कात्रण ट्विट केले आहे. या आरोपात तथ्य असेल तर ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे. मध्य प्रदेश सरकारने त्वरीत याप्रकरणी चौकशी सुरू करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे.