ठाकरे गटाच्या राज्यसभेतील खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यानंतर चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी अमित शाहांची भेट का घेतली? असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत आपली भूमिका स्पष्ट केली. त्या बुधवारी (५ एप्रिल) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, “मी अमित शाहांना म्हणाले की, महाराष्ट्रात गृहमंत्र्यांच्या भूमिकेबाबत अहवाल मागण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील संस्कार आणि संस्कृती कधीही महिलांबरोबरच्या अशा मारहाणीचे प्रकार सहन करणार नाही. मी या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे.”

“गुन्हा दाखल करण्याऐवजी पोलीस पीडित महिलेच्या मागे लागले”

“हे खरं आहे की, महाराष्ट्राचे गृहमंत्री अपयशी ठरले आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना फटकारले आहे. संभाजीनगर दंगलीत कशी हिंसा झाली हे सर्वांनी पाहिलं आहे. आता रोशनी शिंदेंना मारहाण झाली आहे. त्यांना मारहाण झाली याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याऐवजी पोलीस पीडित महिलेच्या मागे लागली आहे. ही कोणत्या प्रकारची कायद्याची स्थिती आणि कोणता न्याय आहे,” असं मत प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केलं.

“मी अमित शाहांच्या ही गोष्ट लक्षात आणून दिली”

“मी अमित शाहांच्या ही गोष्ट लक्षात आणून दिली आहे. त्यावर ते मला म्हणाले की, आम्ही दोषींवर कारवाई करू. याबाबत त्यांनी आश्वासन दिलं आहे,” असंही चतुर्वेदी यांनी नमूद केलं.

हेही वाचा : उद्धव ठाकरेंकडून ‘फडतूस गृहमंत्री’ अशी टीका, देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले, “लाळ घोटत…”

“सहा महिन्याच्या गर्भवती महिलेला मारहाण झाली”

प्रियंका चतुर्वेदी पुढे म्हणाल्या, “एका महिलेसाठी आई होणं सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. राजकीय मतभेद आहेत म्हणून सहा महिन्याच्या गर्भवती महिलेला मारहाण झाली. हे किती योग्य आहे. महाराष्ट्राची संस्कृती महिलांना अशाप्रकारे अपमानित करणं शिकवत नाही. आम्ही हे सहन करणार नाही. आम्ही आक्रोशित आहोत आणि त्याविरोधात मुंबईत मोर्चा निघत आहे.”

हेही वाचा : “मी त्या-त्या व्यक्तीला तुरुंगात टाकणार”, देवेंद्र फडणवीसांचा थेट इशारा, नेमकं काय म्हणाले? वाचा…

“फडणवीसांना पदावरून हटवा किंवा राजीनामा घ्या”

“पोलिसांनी त्यांचं काम केलं पाहिजे आणि त्यांच्यावर कोणताही राजकीय दबाव येऊ नये. ज्यांनी हे काम केलं त्यांना शिक्षा झाली पाहिजे. महाराष्ट्राचे गृहमंत्री प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. त्यांना पदावरून हटवणे, त्यांचा राजीनामा घेणं हेही योग्य ठरेल. कारण महाराष्ट्राचे गृहमंत्री अपयशी ठरले आहेत,” असा आरोप चतुर्वेदींनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thackeray faction mp priyanka chaturvedi tell why she meet hm amit shah pbs