खलिस्तान समर्थक हरदीप सिंग निज्जर याच्या हत्या प्रकरणावरून भारत व कॅनडादरम्यानचे संबंध ताणले गेले आहेत. या हत्येत भारताचा सहभाग असल्याचे आरोप भारत सरकारनं फेटाळून लावले आहेत. भारतानं कॅनडामधील आपली व्हिसा सेवा तात्पुरती स्थगित केली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर या प्रकरणाची जोरदार चर्चा होत असताना आता या मुद्द्यावरून ठाकरे गटानं पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा सरकारला लक्ष्य केलं आहे. तसेच, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे एक पोरकट बुद्धीचे पुढारी असल्याची टीकाही ठाकरे गटानं केली आहे.
“जस्टिन ट्रुडो पोरकट बुद्धीचे”
“हरदीप सिंग निज्जरच्या हत्येत भारतीय अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप जस्टिन ट्रुडोसाहेबांनी केला, पण त्याचे पुरावे ते देत नाहीत. हा त्यांचा कॅनडातील खलिस्तानी चळवळ्यांची राजकीय सहानुभूती मिळविण्याचा डाव आहे. जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडाच्या संसदेत आरोप करून भारताची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, पण युरोपियन राष्ट्रांनी जस्टिन ट्रुडो यांना फारसे गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. जस्टिन ट्रुडो हे एक पोरकट बुद्धीचे पुढारी आहेत. असे लोक आपल्या देशातही सत्ताधारी पक्षात आहेत”, असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
“…ही मूर्खपणाची लक्षणं”
“कॅनडाच्या भूमीवरून भारतविरोधी कारवायांना बळ मिळत आहे. टोरांटो, व्हॅन्कुवर येथे खलिस्तानी विचारांचे लोक एकत्र जमतात व ते भारताचे तुकडे तुकडे करण्याची बेलगाम भाषा करतात, जस्टिन ट्रुडो हे यावर निर्लज्जपणे मत व्यक्त करतात की, ‘हे तर त्या लोकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे’. एका देशाच्या फाळणीची भाषा, हिंसाचाराची भाषा करणाऱ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली राजकीय संरक्षण देणे ही मूर्खांची लक्षणे आहेत. एका जमातीच्या व्होट बँकेपुढे पत्करलेली ही शरणागती आहे”, अशा शब्दांत ठाकरे गटानं जस्टिन ट्रुडो यांना लक्ष्य केलं आहे.
भारत-कॅनडा तणाव वाढला; पंतप्रधान ट्रुडो म्हणतात, “आम्हाला हे प्रकरण वाढवायचं नव्हतं, फक्त…”!
“२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी भारत-पाकिस्तान हा गुळगुळीत विषय झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानची जागा आता खलिस्तान घेईल, असे चित्र स्पष्ट झाले आहे. भारताला खलिस्तान चळवळ्यांपासून धोका आहे. त्यामुळे भाजप व मोदींना मते द्या, हा उद्या प्रचाराचा मुद्दा बनला तरी आश्चर्य वाटायला नको. पाकिस्तान काय किंवा खलिस्तान काय, आपल्या देशात राजकारण व निवडणुकांसाठी काहीही चालू शकते. ‘कॅनडा विरुद्ध भारत’ हा सामना आता ‘भारत विरुद्ध पाकिस्तान’ची जागा घेत आहे”, अशी भूमिका ठाकरे गटानं मांडली आहे.