महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी अखेर आज ( १६ मार्च ) नऊ महिन्यांनी पूर्ण झआली आहे. आता सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार? याकडे महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलं आहे. आज शिवसेनेच्या ( ठाकरे गट ) वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी युक्तीवाद केला. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर शिवसेना ( खासदार ) अनिल देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.
सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे हा निर्णय जाणार का? याबद्दल विचारलं असता अनिल देसाई म्हणाले, “दोन-तीन मुद्द्यांसाठी हा निर्णय सात सदस्यांच्या घटनापीठाकडे पाठवायचा का नाही? हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा आहे. निवडणूक आयोगाच्या बाबत उद्या सुनावणी होणार नाही. पुढच्या तारखेला क्रमवार तपशील मांडण्यात येईल.”
राज्यपालांची भूमिका संशयास्पद वाटते का? यावर अनिल देसाईंनी सांगितलं, “राज्यपालांच्या भूमिकेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी विस्तृत टिप्पणी करत, कार्यकक्षेच्या बाहेर जाऊन उल्लंघन केल्याचं म्हटलं.”
निवडणूक आयोसंदर्भात पुढची तारीख जाहीर होईलपर्यंत व्हीपची कारवाई होणार? यावर अनिल देसाई म्हणाले, “मार्च महिन्याच्या शेवट किंवा एप्रिल महिन्यात यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत व्हीपच्या कारवाईपासून संरक्षण आहे. याबद्दल समोरील बाजूच्या वकिलांनीही मान्य केलं आहे.”
हेही वाचा : “…तिथेच शिंदे गटानं घटनात्मक चूक केली”, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर ठाकरे गटाची प्रतिक्रिया
दरम्यान, ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी संस्कृत सुभाषिताने सर्वोच्च न्यायालयातील युक्तीवादाचा शेवट केला आहे. “कोकीळ आणि कावळा हे दोघेही एकाच रंगाचे… कधी कधी कावळा पण कोकीळ असल्याचं नाटक करतो. मात्र, जेव्हा पहाट होते तेव्हा पितळ उघडलं पडतं… कोकीळ गाते आणि कावळा काव काव करतो,” असे देवदत्त कामत यांनी सांगितलं.