गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात मराठा आक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. हे प्रकरण आता केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडेही गेलं आहे. त्यामुळे याप्रकरणी आता केंद्र सरकारनेच काहीतरी तोडगा काढावा अशी मागणी केली जातेय. याबाबत ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी आज संसदेत मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडणार आहेत.
संसदेच्या हिवाळी अधिवेशाला आजपासून सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने प्रियंका चतुर्वेदी आज संसदेत उपस्थित होत्या. त्यांच्याशी एएनआयने संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारवर टीका करत मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडणार असल्याचं सांगितलं.
प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथे भाजपाला मिळालेलं यश आश्चर्यकारक आहे. परंतु, ते अभिनंदनास पात्र आहेत. लोकांमध्ये जाऊन त्यांनी विश्वास निर्माण केला. निवडणूक प्रचारात चेहरा नव्हता. मुख्यमंत्री पदाचा चेहरा नव्हता. नरेंद्र मोदी स्वतः निवडणूक प्रचार करत होते. त्यामुळे जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला यात दुमत असू शकत नाही.
“विधानसभा निवडणुकांच्या निकालाचा लोकसभेत परिणाम जाणवत नाही. जनता देशाच्या मुद्द्यांवरून मतदान करते. त्यामुळे येणाऱ्या काळात इंडिया आघाडी रणनीती ठरवून जागा वाटप केलं जाईल”, असंही प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.
दरम्यान, विरोधकांनी विधानसभा निवडणुकींवरून संसदेत गोंधळ घालू नये. संसदेत सकारात्मकता ठेवावी, असं आवाहन आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं होतं. त्यावर उत्तर देताना प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जास्तवेळ संसदेत येत नाहीत. त्यांचेच खासदार संसदेत कामकाज होऊ देत नाहीत. त्यांची सर्वाधिक संख्या आहे. तरीही विरोधकांना बोलू दिल जात नाही. भ्रष्टाचार, अदानी प्रकरण, मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे. आज शुन्य प्रहारात मी मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडणार आहे, असं प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.