लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात एनडीए आघाडीचं सरकार स्थापन झालं. नरेंद्र मोदींनी रविवारी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबर एनडीएमधील जवळपास ७० खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षालाही काही मंत्रीपदे देण्यात आली. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचा उल्लेख भटकता आत्मा असा केला होता. त्यानंतर या विधानावरून आरोप-प्रत्यारोप झाले. आता केंद्रात एनडीएचं सरकार स्थापन झालं. यामध्ये नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू सहभागी झाले आहेत. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू यांच्यावर टीका केली. “केंद्र सरकारमध्ये नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे दोन अतृप्त आत्मे आहेत”, असा हल्लाबोल राऊतांनी केला.
संजय राऊत काय म्हणाले?
“लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भटकती आत्मा सुरु होतं. त्यावर उद्धव ठाकरे यांनीही प्रत्युत्तर दिलं होतं. आता केंद्र सरकारमध्ये दोन अतृप्त आत्मे आहेत. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे दोन अतृप्त आत्मे आहेत. आधी त्यांच्या अतृप्त आत्म्याचं समाधान मोदींनी करावं. शरद पवारांनी म्हटलं आहे की भटकती आत्मा कोणाला सोडणार नाही. आता जोपर्यंत नरेंद्र मोदींना पदावरून खाली खेचणार नाहीत, तोपर्यंत आमचा आत्मा शांत राहणार नाही. सगळ्यात आधी नरेंद्र मोदींना त्या दोन अतृप्त आत्म्यांची शांती करायला हवी”, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
हेही वाचा : “हा भटकता आत्मा तुम्हाला…”, शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना सुनावले खडे बोल…
“ज्या पद्धतीने मंत्रीमंडळाचं वाटप करण्यात आलं, त्यावरून दिसतं आहे की, एनडीतील सर्वांचाच आत्मा अतृप्त आहे. महाराष्ट्रात आमचा सर्वांचा आत्मा अतृप्त आहेच. कारण जोपर्यंत तुम्हाला सत्तेवरून खाली खेचणार नाही तोपर्यंत आमचा आत्मा भटकत राहणार आहे. विधासभेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवणार आणि आम्ही जिंकणार”, असंही राऊत यावेळी म्हणाले.
“केंद्रात आता नरेंद्र मोदीचं सरकार नाही, तर एनडीएचं सरकार आहे. आम्ही यापुढे नरेंद्र मोदींना प्रश्न विचारणार नाहीत. आता नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना प्रश्न विचारणार आहोत. कारण त्यांच्याशिवाय हे सरकार बनलं नाही. नरेंद्र मोदीची ही सत्ता उधारीची आहे. जोपर्यंत नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांची मेहरबान आहे, तोपर्यंत मोदी सत्तेत राहतील”, अशा शब्दात संजय राऊतांनी टीका केली.
ईडी, सीबीआय हीच त्यांची ताकद
“मंत्रीमंडळामध्ये एकही मुस्लिम व्यक्ती नाही. कारण नरेंद्र मोदींना वाटत असेल की एकाही मुस्लिमांनी मतदान केलं नाही, त्यामुळे त्यांनी एकही मुस्लिम व्यक्ती मंत्रीमंडळामध्ये घेतला नाही. आम्ही नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना प्रश्न विचारत आहोत की त्यांना हे मंजूर आहे का? आता ते देखील मोदी, शाहांच्या दबावात आले का? मंत्रीमंडळाचं वाटप करत असताना कोणालाही काही दिलं नाही. फक्त भाजपाच्या नेत्यांना मंत्रीपद दिली आहेत, त्यामुळे हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही. नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे दुसऱ्यांच्या ताकदीला खूप घाबरतात. नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची ताकद फक्त ईडी, सीबीआय, पोलीस, आयकर विभाग हीच असून तो त्यांचा आत्मा आहे”, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला.