थायलंडमधील संसद बरखास्त झाली असली तरी पंतप्रधान श्रीमती यिंगलक शिनावात्रा यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा हट्ट निदर्शकांनी कायम ठेवला असून शिनावात्रा यांना आपण राजीनामा देणार नाही असे सांगताना रडू कोसळले. शिनावात्रा यांनी संसद बरखास्त करून २ फेब्रुवारी रोजी मध्यावधी निवडणुका घेण्याची घोषणा केली आहे. सरकारविरोधी नेत्यांनी मात्र त्यांना चोवीस तासांत पद सोडण्याचा इशारा दिला आहे.
यिंगलक या संरक्षण मंत्रीही असून त्यांनी द आर्मी क्लब येथे मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीत सांगितले की, आपण थायलंडवासीय एकमेकांचे बांधव आहोत, आपण एकमेकांना दुखावता कामा नये. आपण आतापर्यंत माघार घेतली आहे व आणखी किती माघार घ्यावी लागेल हे माहीत नाही. तुम्हा देशवासीयांना आपण या भूमीवर पाऊल ठेवू नये असे वाटत आहे काय, असा प्रश्नही त्यांनी केला.
निदर्शकांनी शिनावात्रा वंशाचा निषेध करू नये व लोकशाही मार्गाने होणाऱ्या निवडणुकांत भाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केल्याचे  बँकॉक पोस्टने म्हटले आहे. सत्ताधारी फेउ थाइ पक्षाने काल रात्री झालेल्या बैठकीत यिंगलक यांना पुढील निवडणुकीतील उमेदवारांच्या यादीत अग्रस्थानी ठेवण्याचे मान्य केले असे पक्षाचे प्रवक्ते प्रॉमपॉँग यांनी सांगितले.
प्रॉमपाँग यांनी सांगितले की, पुढील निवडणुका जिंकल्या तर यिंगलक यांनाच पंतप्रधानपद दिले जाईल, कारण त्यांनी सध्याच्या काळात खंबीर नेतृत्व दिले असून लोकशाहीचे संरक्षण करणारे निर्णय घेतले आहेत. थायलंडमध्ये पुढील वर्षी २ फेब्रुवारी रोजी निवडणुका होत असून यिंगलक यांनी संसद बरखास्त केली आहे. दरम्यान रिफॉर्म कमिटीने यिंगलक यांना पद सोडण्यास २४ तासांची मुदत दिली आहे.

Story img Loader