दाक्षिणात्य आणि विशेषकरून तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता थलपती विजय याने आज स्वतःचा पक्ष स्थापन केल्याची घोषणा केली. त्यानंतर तमिळनाडूमधील प्रमुख विरोधी राजकीय पक्ष असलेल्या अण्णद्रमुक पक्षाच्या नेत्याने भाजपावर मोठा आरोप केला आहे. अण्णाद्रमुक पक्षाचे नेते कोवल सत्यन म्हणाले की, भाजपाला तमिळनाडूमध्ये हातपाय पसरण्यासाठी चित्रपटसृष्टीतील एका अभिनेत्याची गरज होती. यापुढे भाजपा विजय यांच्यासह काम करताना दिसेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“भाजपाने याआधी रजनीकांत यांच्यासह नशीब आजमावून पाहिलं आणि रजनीकांत यांना राजकारणात येण्यासाठी दबाव टाकला. पण काही कारणामुळे रजनीकांत राजकारणातून बाहेर पडले. आता भाजपाने विजयच्या माध्यमातून नवा जुगार खेळला आहे. तमिळनाडूमध्ये आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी त्यांना चित्रपटसृष्टीतील एक चेहरा हवाच होता”, अशी प्रतिक्रिया अण्णाद्रमुकचे नेते कोवल सत्यन यांनी एएनआयशी बोलताना दिली.

आंबेडकर, पेरियार वाचा, फेक न्यूजपासून सावध रहा; तमिळ सुपरस्टार विजयचा विद्यार्थ्यांना संदेश

सत्यन यांची ही प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांच्या एक्सवरील पोस्टनंतर समोर आली. तमिळनाडूचे भाजपा प्रमुख के. अन्नामलाई यांनी एक्स अकाऊंटवरून थलपती विजय यांचे अभिनंदन केले. त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी विजय यांचा उल्लेख ‘बंधू’ असा केला. “माझे बंधू विजय यांनी ‘तमिलगा वेत्री कझघम’ हा पक्ष स्थापन केल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो. तमिळनाडूतील जनतेचे शोषण करणाऱ्या भ्रष्ट राजकारण्यांविरुद्ध लढण्यासाठी आणि सामान्य लोकांसाठी काम करण्यासाठी त्यांनी पक्षविरहित राहून, प्रामाणिक काम करावे, अशा त्यांना शुभेच्छा देतो”, अशी पोस्ट के. अन्नामलाई यांनी केली.

दुसरीकडे, विजय यांनी आज राजकीय पक्षाची स्थापना केली असली तरी त्यांनी अद्याप पक्षाचे ध्येय, धोरणे आणि विचारधारा जाहीर केलेली नाही. पक्षाची घोषणा केल्यानंतर ते म्हणाले की, तमिळनाडूमधील सध्याचे राजकारण हे प्रशासकीय पातळीवर भ्रष्ट झाले आहे आणि धर्म व जातीच्या मुद्द्यावर लोकांची विभागणी केली जात आहे.

तमिळ स्टार ‘थलापथी’ विजयची राजकारणात एंट्री; विजयच्या राजकारणातील प्रवेशामागे कारण काय?

तमिळनाडूला निस्वार्थी, पारदर्शक, धर्मनिरपेक्ष, दूरदर्शी आणि भ्रष्टाचारमुक्त शासन मिळणे अत्यावश्यक झाले आहे, असेही थलपती विजय म्हणाले. राजकीय पक्षाची घोषणा करत असताना आपला पक्ष २०२६ च्या तमिळनाडूमधील विधानसभा निवडणुका लढविणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, विजय त्यांच्या ६९ व्या चित्रपटाचे काम सध्या करत आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर ते पूर्णवेळ राजकारणात सक्रिय होणार आहेत.