गुजरातमधल्या एका तरुणाने दिवाळीच्या सुट्टीसाठी ट्रेनच्या एसी डब्याचं तिकिट बुक केलं. मात्र ट्रेनमध्ये चढण्यासाठीच इतकी गर्दी झाली की या तरुणाला घरी जाताच आलं नाही. तिकिट नसणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीमुळे या तरुणाला एसीचं तिकिट असूनही ट्रेन पकडता आली नाही. २७ वर्षांच्या या युवकाने याविषयी X या सोशल मीडिया साईटवर पोस्ट करत आपली खंत आणि संताप व्यक्त केला आहे. अंशुल शर्मा असं या युवकाचं नाव आहे. त्याला रतलाम या ठिकाणी जायचं होतं म्हणून त्याने एसी डब्याचं तिकिट बुक केलं. मात्र गर्दी आणि धक्काबुक्कीमुळे त्याला ट्रेनमध्ये चढताच आलं नाही.
काय म्हटलं आहे अंशुल शर्माने?
मी जेव्हा स्टेशनवर पोहचलो तेव्हा इतर ट्रेन प्रवाशांनी तुडुंब भरुन येत होत्या. अनेक प्रवासी विनातिकिटच होते. मी वडोदरा स्टेशनवर पोहचलो तेव्हा पाहिलं की प्लॅटफॉर्मवर बरीच गर्दी झाली आहे. पण माझ्याकडे थर्ड एसीचं तिकिट होतं त्यामुळे मी निश्चिंत होतो. रतलाम या ठिकाणी जाण्यासाठी मी ११७३ रुपये भरुन तिकिट बुक केलं होतं. आपल्याला जागा मिळेलच असं मला वाटलं होतं. मात्र फलाटावर गेल्यानंतर माझा भ्रमनिरास झाला. फलाटावर ट्रेन येताच आतमध्ये जाण्यासाठी इतकी गर्दी आणि धक्काबुक्की झाली की मला आतमध्ये जाताच आलं नाही. पोलिसांकडूनही काहीही मदत मिळाली नाही. त्याने याच विषयीचे व्हिडीओ आणि फोटोही पोस्ट केले आहेत.
आपल्या एक्स पोस्टमध्ये काय म्हणाला अंशुल शर्मा?
PNR 8900276502
भारतीय रेल्वे विभागाचं दळभद्री नियोजन. माझ्या दिवाळीच्या सुट्टीवर बोळा फिरवल्याबद्दल धन्यवाद. तुम्हीच मला रतलामला जाण्याचं कन्फर्म तिकिट दिलं होतंत. मात्र गर्दी इतकी प्रचंड झाली की मला ट्रेनमध्ये चढताच आलं नाही. उलट कन्फर्म तिकिट काढूनही मला धक्काबुक्की झाली. मीच नाही माझ्याप्रमाणे अनेक लोक असे होते ज्यांच्याकडे तिकिट असूनही त्यांना ट्रेनमध्ये चढताच आलं नाही. अशी संतापजनक पोस्ट करत अंशुल शर्माने माझे ११७३ रुपये मला परत द्या अशी मागणी केली आहे.
अंशुल म्हणाला इतर ट्रेन्स प्रमाणे रतलामला जाणारी ट्रेनही भरुन आली होती. प्रवासी इतक्या मोठ्या प्रमाणावर होते की या ट्रेनच्या एसी डब्याचे दरवाजेही धड उघडले गेले नाहीत. माझं सोडून द्या मला घरी जाता आलं नाही.. मात्र ट्रेनमध्ये काही महिला होत्या त्यांना बहुदा उतरायचं होतं पण त्या आपल्या जागेवर जाण्यासाठी विनंती करत होत्या पण कुणीही गर्दीतून हटायलाच तयार नव्हतं. मला सोडायला मित्र आला होता. त्याला फोन करुन मी सांगितलं की मला ट्रेनमध्ये चढता आलं नाही कारण प्रचंड गर्दी आहे. तो पोलिसांना घेऊन आला तेव्हा पोलीस मलाच हसू लागले. तसंच इतकी वेड्यासारखी गर्दी आहे तर आम्ही काय करणार? असा प्रश्न त्यांनी मलाच विचरला. मग त्यांनी इथे ड्युटी करुन काय उपयोग असाही प्रश्न अंशुलने विचारला आहे. आता मला घर गाठता आलेलं नाही आणि नियोजन शून्य प्रकारामुळे ट्रेनमधून प्रवासही करता आलेला नाही. त्यामुळे माझे पैसे मला परत मिळावेत अशीही मागणी अंशुल शर्माने केली आहे.