१९८४ च्या शीख विरोधी दंगलीची चौकशी करण्यासाठी शिरोमणी अकाली दलाच्या विनंतीची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केल्यानेच आज यातील दोषी सज्जन कुमारला शिक्षा झाली, त्यामुळे आजचा कोर्टाचा निर्णय हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी म्हटले आहे.

बादल म्हणाल्या, आज सज्जन कुमारला शिक्षा झाली, उद्या जगदीश टायटलरला होईल त्यानंतर कमलनाथ आणि अखेर गांधी कुटुंबाला शिक्षा होईल. खून का बदला खून, जब एक बडा दरख्त गिरता है तो धरती हिलती ही है, अशी चिथावणी पंतप्रधानांनी टीव्हीवरुन दिली होती. त्यानंतर आम्ही स्वतःला वाचवायला सैरावैरा धावत होतो, त्यावेळी सर्वशक्तीमान देवानं आम्हाला वाचवलं. या दंगलीमध्ये हजारो निरपराध लोकांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.

तत्कालीन पंतप्रधानांच्या आदेशाने काँग्रेस नेते पोलिसांसह शीखांच्या घरात घुसले होते. त्यावेळी लहान मुलं रडतं होते. त्यांच्या तोंडून एकही शब्द निघत नव्हता. मला आजही ते स्पष्टपणे आठवते, अशा प्रकारे बादल यांनी त्यावेळची आठवण सांगितली.


यावेळी बिक्रम सिंह मजिठीया म्हणाले, ज्या प्रकारे ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातील ख्रिश्चिअन मिशेलचे वकिलपत्र काँग्रेसच्या वकीलांनी घेतले. त्याचप्रकारे गांधी कुटुंबाचे हितसंबंध असल्यानेच काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांचे पुत्र अमित सिब्बल यांनी सज्जन कुमारचे वकिलपत्र घेतले आहे.

Story img Loader