वृत्तसंस्था, सेऊल
युक्रेन युद्धामध्ये खंबीरपणे पाठिंबा दिल्याबद्दल रशियाने उत्तर कोरियाचे आभार मानले आहेत. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह हे बुधवारपासून दोन दिवसांच्या उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर असून त्यांनी उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन आणि परराष्ट्रमंत्री चो सुन हुई यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांचा विस्तार करण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांसाठी एकमेकांची प्रशंसा केली. लावरोव्ह यांच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी युद्धामध्ये खंबीरपणे पाठिंबा दिल्याबद्दल उत्तर कोरियाचे आभार मानले. युक्रेन युद्धात रशियाची युद्धसज्जता वाढवण्यासाठी उत्तर कोरियाकडून दारूगोळा मिळत असल्याचा अमेरिकेला संशय आहे.
हेही वाचा >>>Ind vs Pak: तेव्हा माझा डोळा फुटला असता, पण आम्ही त्याचा बाऊ केला नाही- इरफान पठाण
या दौऱ्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या उत्तर कोरिया भेटीची काही घोषणा होते का याकडे बाह्य जगाचे लक्ष आहे. गेल्या महिन्यात उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांनी पुतिन यांच्या आमंत्रणावरून रशियाचा दौरा केला होता. त्याचवेळी त्यांनी पुतिन यांना उत्तर कोरियाला येण्याचे आमंत्रण दिले होते. किम यांच्या दौऱ्यात दोन्ही नेत्यांदरम्यान झालेल्या चर्चेचा तपशील अद्यापही उघड करण्यात आलेला नाही.