वादंग निर्माण होईल अशी मुक्ताफळे उधळून चर्चेत येण्याचे तंत्र आत्मसात केलेले केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी पुन्हा एकदा आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली आहे. दिल्ली सामूहिक बलात्कारपीडित तरुणीची ओळख उघड करण्यास काय हरकत आहे अशा प्रकारचे विधान त्यांनी केले आहे. एवढेच नव्हे तर बलात्कारविरोधी कायद्यात सुधारणा करून त्या कायद्याला ‘त्या’ तरुणीचेच नाव द्यावे अशी कल्पनाही त्यांना सुचली आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री शशी थरूर यांनी दिल्लीत सामूहिक बलात्काराला बळी पडलेल्या मुलीची ओळख उघड करण्याचा आग्रह धरला आहे. ट्विटरवरून त्यांनी या विषयावर टिप्पणी केली आहे. ‘त्या’ तरुणीची ओळख लपवून काय हशील? उलट या घटनेनंतर बलात्काऱ्यांना शिक्षा देण्यासाठी असलेल्या कायद्याची पुनर्रचना करण्याची मागणी होत आहे. ही मागणी योग्यच असून सुधारित कायद्याला या मुलीचेच नाव द्यावे अशी कल्पना थरूर यांनी सुचवली. तिच्या पालकांची हरकत नसेल तर असे करण्यास कोणाची काही हरकत नसावी, असेही थरूर ‘ट्विट’ करतात.
थरूर यांच्या या ट्विटवर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
काय सांगतो कायदा..
कायद्यानुसार बलात्कारित महिलेची ओळख उघड करणे, प्रकाशित करणे किंवा तिचे छायाचित्र काढणे हा दखलपात्र गुन्हा आहे. ‘त्या’ तरुणीचा तपशील सादर केल्याप्रकरणी एका इंग्रजी दैनिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा