इंडियन मुजाहिदीनचा संस्थापक आणि कुख्यात दहशतवादी यासिन भटकळला अटक होणे, हे भारतीय सुरक्षायंत्रणाचे मोठे यश मानावे लागेल. गेल्या चार वर्षांपासून राज्यातील आणि केंद्रीय तपास यंत्रणा यासिन भटकळच्या शोधात होत्या. देशात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये यासिन भटकळचाच हात होता, हे तपासात स्पष्ट झाले होते. वेगवेगळ्या तरुणांच्या साह्याने यासिन भटकळ पूर्वनियोजित कट आखून गर्दीच्या ठिकाणी स्फोट घडवून आणत होता. त्यामुळे पोलिस त्याचा शोध घेत होते.
खालील ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांसाठी यासिन भटकळ हवा होता…
- पुण्यात १३ फेब्रुवारी २०१० रोजी जर्मन बेकरी बॉम्बस्फोट यासिन भटकळनेच घडवून आणला होता. पोलिसांनी त्याचा शोध लावणाऱयाला दहा लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते.
- मुंबई १३ जुलै २०११ रोजी झवेरी बाजार, दादर आणि ओपेरा हाऊस या तीन ठिकाणी झालेले बॉम्बस्फोटही यासिन भटकळनेच घडवून आणले होते.
- याचवर्षी २१ फेब्रुवारी रोजी हैदराबादमधील दिलसुखनगरमध्ये झालेल्या दोन शक्तीशाली बॉम्बस्फोटातही यासिन भटकळचाच हात होता. दोनपैकी एक बॉम्ब स्वतः यासिन भटकळनेच घटनास्थळी ठेवल्याचे एनआयएने केलेल्या तपासात स्पष्ट झाले होते. दिलसुखनगरमधील बस थांब्याजवळ हे स्फोट झाले होते.
- दिल्ली, सूरत, अहमदाबाद, बंगळुरू या सर्व ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या स्फोटांमागे यासिन भटकळचाच हात होता. त्यामुळेही सुरक्षायंत्रणा त्याच्या मागावर होत्या.