एपी, पॅरिस : वयाच्या २०व्या वर्षी जगभरातील लाखो इस्माइली मुस्लिमांचे आध्यात्मिक नेते झालेले आगा खान यांचे मंगळवारी निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. इस्माइली मुस्लिमांचे आध्यात्मिक नेतृत्व करण्याबरोबरच त्यांनी विकसनशील देशांमध्ये घरे, रुग्णालये आणि शाळा उभारण्यासारख्या कामांसाठी अब्जावधी डॉलरच्या देणग्या दिल्या. त्यांच्या निधनामुळे भारतातूनही शोक व्यक्त केला जात आहे.

आगा खान यांनी आयुष्यातील बराच काळ फ्रान्समध्ये व्यतीत केला. गेल्या काही वर्षांपासून ते पोर्तुगालमध्ये स्थायिक झाले होते. त्यांचे ‘डेव्हलपमेंट नेटवर्क अँड फाउंडेशन’ स्वित्झर्लंडमधून कार्यरत आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

प्रिन्स करीब अल-हुसैनी, आगा खान चतुर्थ आणि शिया इस्माइली मुस्लिमांचे ४९वे वंशज इमाम यांचे मंगळवारी पोर्तुगालमध्ये निधन झाल्याची घोषणा ‘आगा खान फाउंडेशन’ आणि इस्माइली धार्मिक समुदायाने केली. त्यांच्या वारसदाराची घोषणा नंतर केली जाईल, असे फाऊंडेशनने सांगितले. त्यांनी आपल्या मृत्युपत्रात वारसाधिकार निश्चित केला आहे. त्यांचे कुटुंबीय आणि धार्मिक नेत्यांच्या उपस्थितीत ते उघड केले जाईल. अंत्यसंस्कारानंतर त्यांच्या मृत्युपत्राचे वाचन केले जाईल आणि त्यानंतर श्रद्धांजली सभा आयोजित केली जाईल, असेही जाहीर करण्यात आले. इस्माइली समुदायाच्या संकेतस्थळानुसार, वारसदाराची निवड त्यांच्या पुरुष वंशज किंवा नातेवाईकांमधून केली जाते.

प्रेषित मोहंमद यांचे वंशज

आगा खान यांचे कुटुंब इस्लामचे प्रेषित मोहम्मद यांचे थेट वंशज मानले जाते. प्रिन्स करीम आगा खान २० वर्षांचे असताना त्यांच्या आजोबांनी अनपेक्षितपणे स्वत:चा मुलगा अली खान यांना वगळून आगा खान यांना वारसदार घोषित केले होते. वारसदार घोषित करताना नव्या युगात वाढलेल्या तरुणाला नेतृत्व द्यावे, असे त्या वेळी ते म्हणाले होते. .

करीम आगा खान दूरदर्शी होते, ज्यांनी आपले जीवन सेवा आणि अध्यात्मासाठी समर्पित केले. त्यांचे आरोग्य, शिक्षण, ग्रामीण विकास आणि महिला सबलीकरण यांसारख्या क्षेत्रांतले योगदान अनेकांना प्रेरणा देत राहील. नरेंद्र मोदीपंतप्रधान

मौलाना शाह करीम अल-हुसैनी, मानवता, शिक्षण आणि प्रगतीसाठी समर्पित दूरदर्शी नेते. त्यांचे कुटुंबीय आणि भारतातील आणि जगभरातील इस्माइली शिया मुस्लीम समुदायाप्रति संवेदना. राहुल गांधी, काँग्रेस नेते

Story img Loader