महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी खासदार ब्रिजभूषण चरण सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. परंतु, माझ्यावर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले असले तरीही माझ्यावर कोणतीही केस सुरू नसल्याचं ब्रिजभूषण चरण सिंग यांनी स्पष्ट केलं. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
ब्रिजभूषण चरण सिंह म्हणाले, “हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयीन प्रक्रियेवर आम्ही टिप्पणी करू शकत नाही. जे न्यायालयापेक्षा मोठे आहेत ते टिप्पणी करू शकतात. माझ्यावर आरोपपत्र दाखल झाले नाहीत. पोलिसांनी माझ्यावर आरोपपत्र दाखल केलं आहे, त्या आरोपपत्राला मी आव्हान दिलं आहे. त्यामुळे माझ्यावर केस सुरू नाही. आरोपपत्र पोलिसांनी दाखल केलं असून त्याला मी आव्हान दिलं आहे. न्यायालयात काय सांगायचं ते मी न्यायालयात सांगेन. कारण मीडिया ट्रायल करण्यात काही अर्थ नाही.”
ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप झाले, ते स्पॉन्सर्ड होते, असा दावाही त्यांनी केला. यावेळी हे आरोप कोणी स्पॉन्सर्ड केले त्यांची नावेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, “दीपेंदर हुड्डा, भुपेंदर हुड्डा आणि काही उद्योगपतीही आहेत. काही लोकांच्या पोटात दुखायचं ज्यांना मनमानी पद्धतीने कुस्तीला चालवायचं असायचं. परंतु, मी कोणाचंही ऐकलं नाही. मी फक्त कुस्तीची पूजा करतो. जग या गोष्टीला मान्य करेल की आम्ही कुस्तीवर मनापासून प्रेम केलंय.” दरम्यान, दीपेंदर हुड्डा हे काँग्रेसचे खासदार असून भुपेंदर हुडा हे काँग्रेसचे आमदार आहेत.