पीटीआय, बंगळूरु : बंगळूरुमध्ये पार पडलेल्या २६ विरोधी पक्षांच्या आघाडीला नवीन नाव देण्यात आले; ‘इंडिया – इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स’, या नावाने ही आघाडी ओळखली जाईल. जवळपास चार तास चाललेल्या बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यासंबंधी घोषणा केली. हे नाव कसे देण्यात आले यावरून वेगवेगळय़ा चर्चा समोर येत आहेत.
काही नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी ‘इंडिया’ हे नाव सुचवले आणि राहुल गांधी यांनी सहमती दर्शवली. काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी मात्र, राहुल गांधी यांनीच हे नाव सुचवल्याचा दावा केला. त्यामुळे नावाच्या श्रेयाची लढाई रंगते का असे वाटले, पण तसे दिसून मात्र आले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला या आघाडीचे नाव ‘इंडियन नॅशनल डेमोक्रॅटिक इन्क्लुझिव्ह अलायन्स’ असे सुचवण्यात आले. मात्र ‘डेमोक्रॅटिक’ हा शब्द ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’च्या (नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स) नावातही आहे, त्यामुळे दोन्ही नावे फार समान वाटतील असे काही नेत्यांनी लक्षात आणून दिले. त्यानंतर ‘डेमोक्रॅटिक’ हा शब्द बदलून त्याऐवजी ‘डेव्हलपमेंटल’ हा शब्द वापरण्यात आला. यातील ‘नॅशनल’ हा शब्दही वगळावा अशीही सूचना पुढे आली, पण अखेरीस हा शब्द अंतिम नावात ठेवण्यात आला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘इंडिया’ या शब्दासाठी हिंदीमधून टॅगलाईनही लवकरच निश्चित करण्यात येईल. सोमवारी रात्री विरोधी पक्षांच्या आघाडीसाठी अनौपचारिक भोजन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी आघाडीसाठी ‘इंडिया’ हे नाव चर्चेसाठी आले, मात्र त्याचे संपूर्ण नाव ठरवण्यात काही वेळ गेला. एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी औपचारिक चर्चेच्या अगदी अखेरीस ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स’ हे नाव निश्चित करण्यात आले. ‘इंडिया’सह इतर नावांचाही विचार करण्यात आला होता.