पीटीआय, काठमांडू
नेपाळमधील विमान अपघातस्थळावरून यति एअरलाइन्सच्या अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स सोमवारी ताब्यात घेण्यात आला. नेपाळच्या पोखरा येथील नव्याने सुरू झालेल्या विमानतळावर उतरताना रविवारी हे विमान खोल दरीतील नदीपत्रात कोसळून झालेल्या अपघातात पाच भारतीयांसह ७२ प्रवासी ठार झाले होते. बेपत्ता असलेल्या तीन जणांचा शोध सुरू आहे.
६९ पैकी ४१ मृतदेहांची आतापर्यंत ओळख पटली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नेपाळमध्ये सोमवारी राष्ट्रीय शोक दिवस पाळण्यात आला.
विमानातील कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर हे दोन्ही शोधण्यात आले आहेत. रविवारी रात्री थांबवण्यात आलेले मदतीचे प्रयत्न पुन्हा सुरू करण्यासाठी शोध आणि बचाव पथके सोमवारी या ३०० मीटर खोल दरीत उतरली.
कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये (सीव्हीआर) रेडिओ ट्रान्समिशन आणि वैमानिकांमधील संभाषण व इंजिनाचे आवाज यांसारखे कॉकपिटलमधील इतर आवाज ध्वनिमुद्रित केले जातात. तर फ्लाइट डेटा रेकॉर्डरमध्ये (एफडीआर) विमानाचा वेग, उंची व दिशा, तसेच वैमानिकाच्या कृती व महत्त्वाच्या यंत्रणांचे कामकाज यांसारखी ८० हून अधिक प्रकारची वेगवेगळी माहिती रेकॉर्ड केली जाते.
काठमांडू विमानतळावरील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यति एअरलाइन्सचे विमान उतरण्यापूर्वी जुने विमानतळ आणि नवीन विमानतळ यांच्यामध्ये सेती नदीच्या किनाऱ्यावर कोसळल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे दोन्ही बॉक्स हस्तगत करण्यात आले. ते नेपाळच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाकडे सोपवण्यात आले आहेत, असे यति एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बरतौला यांनी सांगितले. आतापर्यंत ६९ मृतदेह हाती लागले असून, उर्वरित तीन बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. किमान ३५ मृतदेहांची आतापर्यंत ओळख पटली असल्याचे पोलीस निरीक्षक ग्यानबहादूर खडका यांनी सांगितले. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उत्तरीय तपासणी करण्यात येईल असे ते म्हणाले.
आणखी वाचा – विश्लेषण : पोखरामध्ये विमान दुर्घटनेत ६८ जणांचा मृत्यू; का आहे नेपाळला अशा भीषण दुर्घटनांचा इतिहास?
विमानतळ व्यवस्थापनाचे स्पष्टीकरण
अपघातग्रस्त विमानाचे कप्तान कमल केसी यांचा सुमारे ११० किलोमीटरवरून पोखरा नियंत्रण कक्षाशी पहिला संपर्क झाला होता. हवामान स्वच्छ होते. आम्ही त्यांना ३० क्रमाकांची धावपट्टी नेमून दिली होती, मात्र कप्तानाने नंतर १२ क्रमांकाच्या धावपट्टीवर उतरण्याची परवानगी मागितली व आम्ही ती दिली. त्यानुसार विमानाने उतरण्यास सुरुवात केली. सगळे काही व्यवस्थित असताना अपघात कसा झाला, हा तपासाचा विषय आहे, असे काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे महाव्यवस्थापक प्रेमनाथ ठाकूर यांनी सांगितले.
अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी उच्चस्तरीय तपास पथक गठित करण्यात आले आहे. व्हॉइस रेकॉर्डर व इतर परिस्थितीची तपासणी केल्यानंतर निष्कर्ष काढण्यात येईल. हे पथक ४५ दिवसांत त्याचा अहवाल सादर करेल, असे ठाकूर म्हणाले.