वृत्तसंस्था, फ्रँकफर्ट
विमानतळांवर ‘चेकइन’साठी लागलेल्या प्रवाशांच्या रांगा, विस्कळीत झालेले बँकिंग कामकाज, रुग्णालयीन सेवांमधील व्यत्यय, बंद पडलेल्या वृत्तवाहिन्या… संगणकातील सायबर सुरक्षा पुरवणाऱ्या कंपनीच्या सॉफ्टवेअरमध्ये निर्माण झालेल्या दोषामुळे शुक्रवारी जगभरातील अनेक देशांनी हा ‘तंत्रकल्लोळ’ अनुभवला. मायक्रोसॉफ्ट विंडोजची कार्यप्रणालीच कोलमडून टाकणारा हा बिघाड पूर्णपणे दूर करण्याचे प्रयत्न शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरूच होते.
मायक्रोसॉफ्ट विंडोजवर आधारित संगणक शुक्रवारी सकाळपासून अचानक ठप्प झाले आणि तांत्रिक दोष दर्शवणाऱ्या ‘निळ्या स्क्रीन’च्या पलीकडे त्यावर काहीही दिसेनासे झाले. हा संघटित सायबर हल्ला असल्याची चर्चा सुरू झाली, प्रत्यक्षात, मायक्रोसॉफ्ट विंडोजवर चालणाऱ्या संगणकांना सायबर सुरक्षा पुरवणाऱ्या कंपनीच्या सॉफ्टवेअरच्या अपडेटमधील त्रुटींमुळे हा गोंधळ उडाल्याचे स्पष्ट झाले. हे सॉफ्टवेअर विकसित करणाऱ्या अमेरिकास्थित ‘क्राऊडस्ट्राइक’ या कंपनीनेच या दोषाची कल्पना देत तो दूर करण्याचे काम सुरू असल्याचे जाहीर केले. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत त्यावर तोडगा निघाला नव्हता. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनीदेखील रात्री उशिरा दिलेल्या निवेदनात ‘बाधित झालेली संगणक यंत्रणा पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे’ असे स्पष्ट केले. ‘क्राऊडस्ट्राइक’चे सॉफ्टवेअर असलेल्या संगणकांतच हा दोष निर्माण झाला असला तरी, या कंपनीच्या ग्राहक कंपन्यांची संख्या प्रचंड मोठी असल्याने या बिघाडाची तीव्रता जास्त आहे.
हेही वाचा >>>“२०४१ पर्यंत आसाम मुस्लीमबहुल राज्य होणार”, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा दावा!
हवाई वाहतूक विस्कळीत
बिघाडाचा सर्वाधिक परिणाम अमेरिका, युरोप आणि आशिया खंडातील विमान सेवांवर झाला. विंडोज ठप्प झाल्यामुळे त्यावर चालणाऱ्या ‘मायक्रोसॉफ्ट ३६५’ हे अॅप आणि त्याच्या सेवाही बंद पडल्या. त्यामुळे विमानतळांवरील प्रवासी ‘चेक इन’ नोंदी आणि तिकीट आरक्षणाची यंत्रणा काम करेनाशी झाली. परिणामी विमानतळांवर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या. हे चित्र मुंबई विमानतळापासून अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटनमधील सर्वच मोठ्या विमानतळांवर शुक्रवारी दिवसभर होते. विविध विमानतळांवरील जवळपास शेकडो विमान सेवा शुक्रवारी रद्द कराव्या लागल्या. तसेच रात्री उशिरापर्यंत हा घोळ सुरूच होता. अमेरिकेतील तीन विमान कंपन्यांचे एकही विमान शुक्रवारी उड्डाण घेऊ शकले नव्हते.
एका त्रयस्थ कंपनीच्या सॉफ्टवेअरमधील दोषाचा फटका जगभरातील विमानवाहतूक, बँका, रुग्णालये, पोस्ट, प्रसारमाध्यमे इत्यादी क्षेत्रांना बसला.