मुंबई उच्च न्यायालयाने एल्गार परिषद प्रकरणातल्या सुधा भारद्वाज यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. त्यांना ८ डिसेंबर रोजी न्यायालयासमोर हजर राहावं लागेल. त्यावेळी त्यांना जामिनासंदर्भातल्या अटीशर्ती आणि जामिनाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल. मात्र या प्रकरणातल्या इतर आठ आरोपींची जामीन याचिका मात्र फेटाळण्यात आली आहे.
महेश राऊत वर्नन गोन्साल्विस, अरुण फरेरा आणि वरावरा राव यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात मानविधकार कार्यकर्त्या सुधा भारद्वाज, व्हर्नन गोन्साल्विस, पी. वरवरा राव, अरूण फरेरा आणि पत्रकार गौतम नवलाखा यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. या सर्वांची पोलिसांनी चौकशी केलेली आहे व यातील बरेचजण तुरूंगातही आहेत. सुधा भारद्वाज साधारण तीन वर्षांपासून तुरूंगातच आहेत. या पूर्वीही त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र तो फेटाळण्यात आला.
१ जानेवारी २०१८ रोजी पुणे जिल्ह्यातल्या शिरुर तालुक्यातील भिमा नदीच्या काठी वसलेल्या कोरेगांव गावात हिंसाचाराची घटना घडली होती. १ जानेवारी रोजी येथे असलेल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी जनता लाखोंच्या संख्येने येथे हजेरी लावते. वर्षानुवर्षे शांततेत पार पडणाऱ्या या सोहळ्याला मागीलवर्षी मात्र काही समाजकंटकांच्या विशुद्ध हेतूमुळे गालबोट लागले होते.
शिवप्रतिष्ठान संघटनेचे संभाजी भिडे आणि हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे यांच्यावर ही दंगल घडवून आणल्याचा आरोप काही दलित संघटनांनी केला होता.