करोनाचा हाहाकार काय असतो ते देशाने आणि जगाने पाहिलं आहे. भारतातही कोरोनाच्या तीन लाटा येऊन गेल्या. आता आपण कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या उंबरठ्यावर उभे आहोत कारण चीन, जपान या देशांमध्ये कोरोनाचे रूग्ण पुन्हा वाढत आहेत. BF7 हा करोनाचा नवा व्हायरंट धोकादायक असल्याची चर्चा आहे. अशात नाकावाटे लस घेता येणंही आता शक्य होणार आहे. यासाठी रूग्णालयांनी मॉक ड्रिल अर्थात सराव सुरू केला आहे.
दहा मुद्द्यांमध्ये समजून घ्या करोनाला तोंड देण्यासाठी काय तयारी आहे?
करोना अद्याप संपलेला नाही. ख्रिसमस साजरा व्हायला कार्यालयांमध्ये सुरूवात झाली आहे. नाताळ साजरा करत असताना करोना वाढणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केलं आहे. कोव्हिड प्रोटोकॉल पाळत त्याप्रमाणेच वागण्याचं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केलं आहे.
भारत बायोटेकने आता नाकाद्वारे देता येणारी करोना प्रतिबंधक लस आणली आहे. या लसीच्या वापराला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने संमती दिली आहे. १८ वर्षे आणि त्यावरील वयाच्या नागरिकांना बूस्टर डोस म्हणून ही लसही घेता येणार आहे. ज्या नागरिकांनी करोनाला प्रतिबंध करणारी कोव्हॅक्सिन किंवा कोव्हिशिल्ड ही लस घेतली आहे त्यांना ही नाकाद्वारे देण्यात येणारी लस बूस्टर म्हणून घेता येणार आहे.
नाकावाटे देण्यात येणारी करोना प्रतिबंधक लस कशी आहे?
नाकावाटे देण्यात येणारी करोना प्रतिबंधक लस ही सुई नसलेली आहे. ही लस सध्या खासगी केंद्रांवर उपलब्ध आहे. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत ही कोविन या पोर्टलवरही उपलब्ध होईल. नाकावाटे देण्यात आलेली ही लस BBV154 किंवा iNCOVACC या लसीला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. नोव्हेंबर महिन्यात या लसीच्या तातडीच्या वापरला संमती दिली गेली आहे.
करोना चीन, कोरिया, ब्राझिल या देशांमध्ये वाढतो आहे. त्यानंतर दक्षिण आशियामध्येही करोनाचा प्रादुर्भाव वाढेल. त्यानंतर पुढच्या २०-३५ दिवसामध्ये करोना भारतातही पसरू लागेल. त्यामुळे आम्ही सर्व ती आवश्यक खबरदारी घेत आहोत असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.सध्या जगातल्या १० देशांमध्ये एकूण करोना केसेसमधल्या ८२ टक्के केसेस आहेत. त्यात जपान आणि चीन आघाडीवर आहेत. चीन मध्ये करोना झालेला एक रूग्ण १६ जणांना संक्रमित करणारा ठरतो आहे.
विविध आरोग्य तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर आरोग्य मंत्रालयाने हेदेखील सांगितलं आहे की ज्या ठिकाणी लसीकरण कमी किंवा अत्यल्प प्रमाणात झालं आहे, ज्या ठिकाणी रूग्णांची प्रतिकार शक्ती कमी झाली आहे अशा भागांमध्ये करोना वाढतो आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय हे लवकर सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची भेट घेणार आहेत. जगात करोना पुन्हा वाढीला लागला आहे अशात काय काळजी घेतली पाहिजे यावर या सगळ्यांची चर्चा केली जाणार आहे तसंच उपाय योजनांबाबतही चर्चा होणार आहे.
मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं आवाहन
करोना वाढत असल्या कारणाने आणि भारतातही करोनाचे रूग्ण वाढण्याची शक्यता असल्याने मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं आवाहन करण्यात आलं आहे. खासकरून विमान प्रवास करणाऱ्यांनी हे केलंच पाहिजे असंही सांगण्यात आलं आहे. ज्या प्रवाशांना लक्षणं दिसत आहेत त्यांनी स्वतःला विलिगीकरणात ठेवलं पाहिजे असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
एअरपोर्ट्सवर रँडम टेस्टिंग
एअरपोर्ट्सवर रँडम टेस्टिंग केलं जातं आहे. विविध देशांमधून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवलं जातं आहे.
भारतात सब व्हेरिएंटचा शिरकाव
भारतात सब व्हेरिएंटचा शिरकाव झाला आहे. BF 7 या नव्या व्हेरिएंटचे रूग्ण भारतातही आढळले आहेत. सध्या चार रूग्ण या व्हेरिएंटची लागण झालेले आहेत. यातला पहिला रूग्ण हा जुलै महिन्यात भारतात आढळला होता आणि तो या व्हेरिएंटने संक्रमित झाला होता. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यातही दोन रूग्ण याच व्हेरिएंटने संक्रमित झाल्याचं आढळून आलं आहे.
कोविन वेबसाईटवर बूस्टर डोस घेण्यासाठी नोंदणी वाढली
कोविन या वेबसाईट आणि पोर्टलवर बूस्टर डोस मिळावा म्हणून नोंदणी वाढली आहे. १८ डिसेंबरपासून ही वाढ झाल्याचं पाहता येतं आहे. चीनमध्ये करोनाचे रूग्ण वाढल्याने आता भारतातही लोक खबरदारीची पावलं उचलत आहेत. एनडीटीव्हीने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.