करोनाच्या साथीने संपूर्ण जगला जवळपास अडीच वर्षे वेठीस धरले होते. करोना विषाणूमध्ये संक्रमण होत आलेल्या लाटेत जगभरात लाखो लोक मृत्युमूखी पडले. करोनावर विविध लसी विकसित झाल्यामुळे ही साथ अखेर आटोक्यात आली. या करोनाच्या महामारीचे परिणाम आजही जग भोगत आहेत. असं असतांना एका अहवालाने खळबळ उडाली आहे.
अमेरिकेतली Science Advances नावाच्या एका मासिकात एक संशोधन – अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये भारतातील करोनामुळे झालेल्या मृत्युंबाबत भाष्य करण्यात आलं आहे. २०२० मध्ये करोना काळात तब्बल ११ लाख ९० हजार मृत्यू झाल्याचं नमूद केलं आहे. या अहवालामुळे केंद्र सरकारच्या, भारताच्या आरोग्य व्यवस्थेवर बोट ठेवण्यात आलं आहे.
अहवालात काय म्हटलं आहे ?
२०२० मध्ये भारतात करोना काळात ११ लाख ९० हजार मृत्यू झाले. तसंच लॉकडाऊन आणि करोनाच्या साथीत निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे असंख्य मृत्यूंची नोंद ही झाली नसल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. तसंच भारतात सरकारी नोंदीपेक्षा आठ पट मृत्यू झाले आहेत असाही दावा करण्यात आला आहे. विविध राज्यातील एकुण सात लाख ६५ हजार लोकांच्या माहिती, २०१९-२० जन्म मृत्यूची आकडेवारी या आधारावर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. २०२० ला झालेल्या मृत्यूंमध्ये महिलांचे प्रमाण जास्त असून ० ते १९ वयोगटातील मृत्यू जास्त असल्याचा दावा करण्यात आला आहे.
हे ही वाचा… ‘पराभवानंतरही अहंकार कसा येतो?’, अमित शाहांचा राहुल गांधींना प्रश्न
केंद्र सरकारने आरोप फेटाळले
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हे आरोप पुर्णपणे फेटाळले आहेत. Science Advances मध्ये प्रसिद्ध झालेला अहवाल हा चुकीच्या गृहितकांवर आधारीत असून अभ्यासासाठी वापरण्यात आलेल्या पद्धतीमध्ये गंभीर त्रुटी आहेत. Civil Registration System (CRS) च्या माध्यमातून मृत्यूंच्या आकडेवारीची नोंद केली जाते, यामध्ये केवळ करोनामुळे झालेल्या मृत्यूंची नोंद नाही. फक्त काही राज्यातील अल्प आकडेवारीवरुन संपूर्ण देशातील आकडेवारीचा निष्कर्ष काढला जाऊ शकत नाही असं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.