जागतिक तापमानवाढ २ अंश सेल्सियस ( ३.६ अंश फॅरनहीट) मर्यादेत ठेवण्यासाठी वेळ निघून चालली असून सध्याचे कार्बन उत्सर्जन बघता त्यातून मोठा धोका होऊ शकतो, असे मत संयुक्त राष्ट्रांच्या हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
‘इंटर गव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज’ या संस्थेच्या (आयपीसीसी) अहवालाचा आढावा घेतल्यानंतर असे सांगण्यात आले की, गेल्या आठ लाख वर्षांत तीन प्रमुख हरितगृह वायूंचे प्रमाण एवढे कधीच नव्हते. पृथ्वी आता इ.स. २१०० पर्यंत ४ अंश सेल्सियसने तापमान वाढण्याच्या उंबरठय़ावर असून त्यामुळे काही ठिकाणी सागरी पातळी वाढेल, प्राणी-वनस्पती यांच्या प्रजाती नष्ट होतील, पूर येतील, दुष्काळ पडतील.
आयपीसीसी या नोबेल विजेत्या संस्थेने या अहवालाचा प्रथमच आढावा घेतला. पुढील महिन्यात लिमा येथे हवामान बदलांवर बैठक होत आहे. त्यात इ.स.२०१५ मध्ये जागतिक तपमान वाढ २ अंश सेल्सियसच्या मर्यादेत ठेवण्याचा निर्धार केला जाणार आहे. गेली अनेक वर्षे हवामान बदल टाळण्यासाठी हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत पण त्यात फार काही निष्पन्न झालेले नाही. आयपीसीसीने म्हटले आहे की, प्रदूषण कमी करण्यासाठी पैसे लागतील, पण त्याचा परिणाम जागतिक आर्थिक वाढीवर होणार नाही याचाही विचार करावा लागेल. या शतकात दरवर्षी कार्बन उत्सर्जन ०.०६ टक्के कमी करण्याची गरज आहे. जर पृथ्वीचे तापमान ३ अंश वाढले तर भूक, बेघर होणे, हिंसक संघर्ष होणे, प्राणी-पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट होणे यासारखे परिणाम होतील. आयपीसीसीच्या २६ वर्षांंच्या इतिहासातील हा पाचवा अहवाल आहे. किमान ८०० तज्ज्ञांनी हा अहवाल तयार केला असून त्याचे विश्लेषणही केले आहे.
ही शेवटची संधी- पचौरी
आयपीसीसीचे प्रमुख राजेंद्र पचौरी यांनी सांगितले की, हवामान बदल रोखण्यासाठी अतिशय अग्रक्रमाने कृती करण्याची गरज आहे. २ अंश सेल्सियसपर्यंत तापमान वाढीची मर्यादा राखण्यासाठी ही संधी आहे. तापमानवाढ २ अंश सेल्सियसच्या खाली असायला हवी व तेही कमी खर्चात करता आले पाहिजे. आपले कार्बन उत्सर्जन २०१० ते २०५० या काळात ४० ते ७० टक्के तर इ.स. २१०० पर्यंत शून्य किंवा कमी पातळीवर आणता आले पाहिजे.