पुणे : करोनाचा संसर्ग आणि त्यापाठोपाठ नागरिकांचे झालेले करोना प्रतिबंधात्मक लसीकरण या कारणांमुळे करोना संसर्गाची तीव्रता कमी झाली असली, तरीही करोनाचे नवनवे प्रकार हे साथरोग संपलेला नसल्याचे स्पष्ट करत आहे. चीनमध्ये आता करोनाच्या ओमायक्रॉनचे दोन नवे उपप्रकार आढळले असून, त्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून वर्धक मात्रेबाबत आग्रही भूमिका घेण्यात येत आहे.
चीनमध्ये ओमायक्रॉन या करोना प्रकाराचे बीएफ ७ आणि बीए.५.१.७ असे दोन उपप्रकार नुकतेच आढळून आले आहेत. हे प्रकार ओमायक्रॉनचे असल्यामुळे त्यांच्या वाढीचा वेग अधिक आहे. नुकतेच चीनमध्ये या नवीन उपप्रकारांचे एकाच दिवसात सुमारे १८०० नवे रुग्ण सापडल्याची माहिती समोर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर इतर देशांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहनही जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात येत आहे. हे उपप्रकार ओमायक्रॉन या सौम्य संसर्ग करणाऱ्या मात्र अत्यंत वेगाने संसर्ग करणाऱ्या करोना प्रकाराचे असल्याने त्याची तीव्रता किती आहे हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांमध्ये हे दोन्ही उपप्रकार मोठय़ा रुग्णसंख्येला संसर्ग करण्यास कारणीभूत ठरतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
राज्याचे करोनाविषयक तांत्रिक सल्लागार आणि माजी आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे म्हणाले, चीनमध्ये या दोन उपप्रकारांमुळे वेगाने संसर्ग होत असल्याची माहिती आहे. केवळ चीनमध्येच नव्हे तर असे उपप्रकार कोणत्याही देशात नव्याने आढळून येण्याची शक्यता यापुढे कायम राहणार आहे. भारतातही बीए.४, बीए.५ आणि बीए.२.७५ या करोनाच्या प्रकारांमुळे रुग्ण संख्येत झपाटय़ाने वाढ झाल्याचे दिसून आले होते. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून करोना प्रतिबंधात्मक नियमांच्या पालनातील सातत्य आवश्यक आहे. मुखपट्टी वापर हा साधा सोपा आणि प्रतिबंधात्मक उपाय आहे. वर्धक मात्रेसह लसीकरण पूर्ण करण्यातून सर्व नव्या प्रकारांविरुद्ध पुरेसे संरक्षण मिळणे शक्य आहे, असेही डॉ. साळुंखे यांनी स्पष्ट केले.